सांगली समाचार - दि. १९|०२|२०२४
मुंबई - देशातील सर्वात लांब असलेल्या समृद्धी महामार्गाच्या तिस-या भरवीर-इगतपुरी टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच वाहतूकीसाठी खुला होणार आहे. केवळ २५ किलोमीटर लांबीचा हा टप्पा असला तरी सध्या घोटी- सिन्नर मार्गावर वाहनधारकांचा जाणारा तब्बल दीड तास वाचणार असून त्यांनी इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक हायवेवर होणारी वाहतूक कोंडी कमी होऊ शकणार आहे.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरमधील अंतर कमी करण्याबरोबरच वाहतूकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल ७०१ किलोमीटर लांबीचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर-मनमाड आणि दुस-या टप्प्यात मनमाड-भरवीर दरम्यानचे काम पूर्ण करून ६०० किमीचा महामार्ग वाहतूकीसाठी खुला केला आहे. अद्यापही भरवीर- ठाणे जिलह्यातील आमणेपर्यंतचा १०१ किलोमीटरच्या माहामार्गाचे काम सुरू होते. आता भरवीर ते इगतपुरी या २५ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तो लवकरच खुला केला जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिले.
सध्या नाशिक जिल्ह्यातील भरवीरपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम झाले असून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यातून संभाजीनगर, नागपूरच्या दिशेने जाणा-या वाहनधारकांना समृद्धी महामार्गावर जायचे असेल तर त्यांना ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरातील वाहतूक कोंडीबरोबरच घोटी-सिन्नर मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यानंतर भरवीर इंटरचेंजवरून समृद्धी मार्गावर जावे लागते. मात्र आता भरवीर-इगतपूरी टप्पा सुरू झाल्यास वाहनधारकांना थेट इगतपुरी येथूनच समृद्धी मार्गावर जाता येणार असल्याने वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.