Sangli Samachar

The Janshakti News

शंभर वर्षांपूर्वीच्या वर्तमानपत्रांनी जीवनमानाबाबत केली होती खास भविष्यवाणी ; आज अंदाज ठरला खरा


सांगली समाचार  | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४


लंडन : 1920 च्या दशकातील अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी शंभर वर्षानंतरचे सामाजिक जीवन कसे असेल याबाबत जे अंदाज व्यक्त केले होते ते आता प्रत्यक्षात येताना दिसत आहेत. ब्रिटनसह इतर देशातील इंग्रजी वृत्तपत्रांनी याबाबत जे अंदाज व्यक्त केले होते.

त्या कात्रणांचा अभ्यास करणाऱ्या एका संशोधकाने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीतील संशोधक पॉल फेरी यांनी हे संशोधन केले असून ते गेले कित्येक वर्षे या कात्रणांचा अभ्यास करत होते. 2024 मध्ये रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात मोटारी धावतील आणि शहरांचा विस्तारही वाढेल असा अंदाज काही दैनिकांनी त्या काळात व्यक्त केला होता. तो आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आजपासून शंभर वर्षाने विमान प्रवासाचे प्रमाण वाढेल आणि अंतराळ संशोधनही मोठ्या प्रमाणावर केले जाईल असा अंदाजही एका वृत्तपत्राने व्यक्त केला होता तोही खरा होताना दिसत आहे.

2024 च्या कालावधीमध्ये लोकांचे आयुर्मान वाढेल आणि ते शंभर पर्यंत पोहोचेल आणि वयाच्या 75 व्या वर्षी सुद्धा व्यक्ती आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतील असाही अंदाज त्या काळातील वृत्तपत्रांनी व्यक्त केला होता. 100 वर्षांपूर्वीच्या कालावधीमध्ये खरे तर व्हिडिओग्राफी हा विषय नव्हता पण एका वृत्तपत्राने शंभर वर्षानंतर फोटोग्राफीची जागा व्हिडिओग्राफी घेईल आणि लोक फोटो बघण्यापेक्षा व्हिडिओ बघण्याला जास्त प्राधान्य देतील असा अंदाजही व्यक्त केला होता.

अर्थात या वृत्तपत्रांनी व्यक्त केलेले सर्वच अंदाज खरे होताना दिसत नाही. काही वृत्तपत्रांनी शंभर वर्षानंतर मोटारीचा जास्त वापर वाढल्याने घोडा या प्राण्याचे अस्तित्व संपेल असा अंदाज व्यक्त केला होता, पण तो खरा ठरलेला नाही किंवा 1924 नंतरच्या 100 वर्षांमध्ये म्हणजे 2024 मध्ये जगात अनेक ठिकाणी अन्नाची भीषण टंचाई जाणवेल असा अंदाज काही वृत्तपत्राची व्यक्त केला होता तोही त्या प्रमाणात खरा होताना दिसत नाही.