सांगली समाचार - दि. २४|०२|२०२४
सांगली - कॉग्रेसने जोपासलेल्या जातीयवादामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले. आता केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातो, परंतु त्यात तथ्य नाही. काँग्रेसने भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम केले. परंतु त्याला Modi Government ने छेद दिला आहे. मुळात ज्याने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. त्याला कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचा टोला मध्य प्रदेशचे ग्रामीण विकास आणि श्रम मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगलीत लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रल्हादसिंह पटेल सांगली दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने प्रखर नेतृत्व मिळाले आहे. यापूर्वीच्या कार्यकाळात सरकार अनेक योजना जाहीर करीत असे, परंतु त्यांची अंमलबजावणी वेळेत होत नव्हती. परिणामी सामान्यांपर्यंत योजना पोहाेचविण्यास बराच कालावधी लागायचा. परंतु मोदी सरकारच्या काळात योजना जाहीर होतात आणि नियोजित वेळेत पूर्ण केल्या जात आहेत. त्याचा लाभ जनतेला मिळतो. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक योजनेमागे असलेले सरकारचे वैचारिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे, असे मंत्री पटेल म्हणाले.
महाराष्ट्रात पूर्वी असलेल्या महाविकास महाआघाडी सरकारने केंद्राच्या योजना सामान्यांपर्यंत पोहाेचविण्यास प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र केंद्र सरकारच्या योजनांमध्ये मागे पडला. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात केला, असा आरोपही मंत्री पटेल यांनी केला. सध्या सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारने योजना राबविण्यावर भर दिला. केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातो, परंतु त्यात तथ्य नाही. मुळात ज्याने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, त्याला कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
सध्या पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये काही गैरकृत्य करणारे लोक घुसले आहेत. आता शेतकरी आंदोलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरदेखील चर्चेतून मार्ग सुटू शकतो. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने चारशे जागांचे लक्ष्य ठेवले आहे. मागील वेळी तीनशेचे लक्ष्य समोर ठेवून ते पूर्ण करण्यास आम्ही यशस्वी झालो होतो. त्यामुळे यंदाही त्याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास मंत्री पटेल यांनी व्यक्त केला.
मिरज हे रेल्वे जंक्शन म्हणून प्रसिद्ध आहे. रेल्वेचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण ज्या गतीने सुरू आहे. त्याचा लाभ नजीकच्या काही काळात प्रवाशांना होणार असल्याचे मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितले. या वेळी खासदार संजयकाका पाटील, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रशांत परिचारक, पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.