सांगली समाचार दि. १२|०२|२०२४
नागपूर : ते म्हणतात दाढी खेचून आणली असती पण दाढी एवढी हलकी असते का? या दाढीने जर काडी फिरवली तर तुमची उरलीसुरली लंकादेखील जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावला आहे.
रविवार ११ फेब्रुवारी रोजी रामटेक येथे शिवसंकल्प अभियानात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "माझ्यावर रोज उठ सुठ आरोप सुरु आहेत. ते म्हणतात दाढी खेचून आणली असती पण दाढी एवढी हलकी असते का? या दाढीने जर काडी फिरवली तर तुमची उरलीसुरली लंकादेखील जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कुणालाही आडवा जात नाही, परंतू, कुणी मला आडवं आलं तर मी सोडतही नाही."
बाळासाहेबांना चोरायला ती एक वस्तू होती का?
"असंगाशी संग करुन सरकार स्थापन केलं तेव्हाच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार सोडले. आता दररोज माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला असे म्हणत आहेत. पण बाळासाहेबांना चोरायला ती काय एक वस्तू होती का? ते हिंदुत्वाचा ज्वलंत एक विचार होते. तेच विचार घेऊन आज आपण पुढे चाललो आहोत. हिंदुत्वाचं ढोंग करायचं आणि सत्तेसाठी हिंदुत्वविरोधी लोकांना साथ द्यायची. अशी नाटकं जनतेला माहिती आहे," अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
ते पुढे म्हणाले की, "काही लोकं म्हणतात राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावा? सरकार कोणताही गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालणार नाही. तुमच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून जेलमध्ये टाकलं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. केंद्रीय मंत्र्याला ताटावरून उठवून अटक केले गेले. गृहमंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवट लावण्याची आठवण आपल्याला आली नाही. मग आता काय झालं? असा सवाल यावेळी केला.