सांगली समाचार - दि. २८|०२|२०२४
कडेगाव : चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत कुणबी नोंदी शोधत असताना १८८९ ते १८९३ च्या काळात तीन मुलींची प्रवेश नोंद आढळली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध सत्ताधीशांच्या काळातील ८०० वर्षांचा लेखाजोखा मोडी लिपीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. आजच्या डिजिटलच्या जमान्यात हा खजिना बाहेर येणे धूसर असताना कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेच्या यानिमित्ताने हा इतिहास थोडाफार उलगडला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतिराव फुले या दाम्पत्यांच्या मार्गावरून जाणाऱ्या हजारोंपैकी तीन मुलींची नोंद चिंचणीत आढळली.
चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत अशोक नगरे यांनी मोडी लिपीवर दिलेल्या माहितीप्रमाणे या शाळेत संभुदा सीताराम पाटील या ६ मे १८८९ मध्ये सहा वर्षांची असताना शाळेत आल्याची व २८ जुलै १८९७ इयत्ता ५वीपर्यंत शिक्षण घेतल्याची व पुढे सासरी गेली सबब काढली अशी नोंद आहे. यानंतर कमळा चंद्रा माने ही मुलगी २ जून १८९१ रोजी सात वर्षांची असताना शाळेत आल्याची नोंद आहे. २२ ऑक्टोबर १८९६ पर्यंत तिने या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. फार दिवस रजेवर सबब काढली अशी नोंद आहे. जया विठू गवंडी ही मुलगी ६ जून १८९३ या तारखेस ८ वर्षे असताना शाळेत आल्याची नोंद आहे. २४ फेब्रुवारी १८९७ पर्यंत शाळा शिकली, पुढे घरकाम करणेकरिता घरी ठेवून घेतले अशी नोंद आहे. या तिन्ही मुलीची वर्तणूक फार चांगली अशी नोंद आहे. या तिन्ही मुलींची कुणबी नोंद आहे.
मुलींना फी माफीच्या नोंदी
१८८२ साली महात्मा फुले यांनी ''विल्यम हंटर शिक्षण आयोगा''समोर निवेदन देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली होती. मात्र, तत्कालीन इंग्रज सरकारने मुलांना फी माफी दिली नसल्याचे व मुलींची फी माफ केल्याच्या नोंदी चिंचणी शाळेत दिसत आहेत.