सांगली समाचार - दि. १७|०२|२०२४
नवी दिल्ली - देशाला सोन्याची चिडीया म्हटले जाते. पण, ही सोन्याची चिडीया अदानींच्या हातात आहे. म्हणूनच सरकार जातीनिहाय जनगणना करायला घाबरते. कारण, त्यामुळे मागासवर्गीय, आदिवासी, गरीबांकडे किती पैसा आहे आणि धनदांडग्यांकडे किती पैसा आहे हे कळेल. पण, काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही आर्थिक सर्वेक्षण करू, कुणाकडे किती पैसा आहे हे बाहेर काढू, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
राहुल गांधी पुढे म्हणाले, एका माजी लष्करी जवानाला शेतकरी आंदोलनात तोंडाला छर्रे लागले. शेतकऱयांवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, रबरी गोळ्यांचा वर्षाव केला. मी त्याला म्हटले, तुम्ही काहीच चुकीचे करत नाही आहात, सीमेवर होता तेव्हा देशासाठी लढत होता. आताही तुम्ही देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहात. अशा शब्दांत शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱयांना शेतमालासाठी आधारभूत किंमत कायदा करू, अशी गॅरंटीही राहुल गांधी यांनी दिली.
भाजपने बिहारचा विकास केला नाही
बिहारच्या विकासाच्या बाता भाजपचे बडे नेते मारत आहेत. परंतु, भाजपने विकासाच्या बाबतीच बिहारला मागे सोडले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने 10 लाख नोकया देण्याचे सांगितले. त्यामुळे नितीश कुमार नाराज होऊन गेले असेही खरगे म्हणाले. मरेन पण, भाजपात जाणार नाही या नितीश कुमारांच्याच विधानाची आठवणही खरगे यांनी यावेळी करून दिली.