Sangli Samachar

The Janshakti News

भाजपचे 'शूटआऊट' तर, विरोधकांचे 'फोटोशूट'





सांगली समाचार दि. ०९|०२|२०२४

मुंबई : राज्याच्या राजकारणात सातत्याने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेतील दोन गट, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण सध्या तरी, शिंदे गट विरुद्ध भाजपा आणि विरोधक असे राजकारण रंगल्याचे चित्र आहे. विशेषत:, उल्हासनगरच्या गोळीबार घटनेनंतर ते प्रकर्षाने जाणवत आहे.

एका जमिनीच्या वादात कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचे काम करत आहेत. त्यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच निर्माण होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आता विरोधकांनी देखील हीच री ओढण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे गुंडांबरोबरचे कनेक्शन विरोधक लोकांसमोर फोटो तसेच व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणत आहेत. यात आघाडीवर आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत. त्यांनी सोमवारपासून सलग तीन दिवस वेगवेगळे फोटो ट्वीट करत एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा द्यायला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आला होता. सोमवारी हाच फोटो संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत, या गुंडाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी, संजय राऊत यांनी पुण्यातील गुंड निलेश घायवळचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री शिंदे तसेच त्यांचे समर्थक आमदार संतोष बांगर आणि निलेश घायवळ दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना, 'महाराष्ट्रात गुंडा राज : गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य,' अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

तर राऊत यांनी, एकनाथ शिंदे हे एका व्यक्तीच्या हाती भगवा झेंडा सोपवित असल्याचा फोटो शेअर केला आहे. 'हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत?' अशी विचारणा त्यांनी केली आहे. वस्तुत: हा फोटो गुंड जितेंद्र जंगम याचा असून काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मिंधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत, अशी बोचरी टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.

काँग्रेसचेही शरसंधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील काल, मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेलेला निलेश घायवळ मंत्रालयात रील तयार करताना दिसतो. निलेश घायवळ सध्या जामिनावर बाहेर आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती 'मोदी की गॅरंटी'? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.