सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४
नवी दिल्ली - पोस्ट खातं म्हटलं की, एक विश्वासाचं नातं समोर येतं. वर्षानुवर्षे आपल्या दारात येत असलेला पोस्टमन नजरेसमोर उभा राहतो. जुन्या कळकट इमारती आणि अशा कितीतरी गोष्टी ज्या पोस्ट खात्याशी निगडित आहेत. परंतु गेल्या काही वर्षात पोस्ट खात्याने कात टाकली, आणि हा विश्वास अधिक दृढ झाला. कुठल्याही पोस्ट खात्यात जा तिथली गर्दी याची साक्ष देईल. आता हाच विश्वास महामार्गावरील टोल नाक्यावर उमटणार आहे फास्ट त्याच्या रूपाने.
केंद्र शासनाने पेटीएम वर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर याच्याशी जोडल्या गेलेल्या करोडो ग्राहकांना फटका बसला. याचा सर्वाधिक फटका टोल नाक्यावरील गर्दी कमी करणाऱ्या यंत्रणेवर होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. कारण फास्ट टॅगसाठी सुमारे दोन कोटी ग्राहक पेटीएमचा वापर करीत असतात. त्यामुळे आता या वाहनधारकांना इतर बँकेचे फास्टॅग घ्यावे लागतील.
परंतु आता फास्ट टॅग वापरणाऱ्या लाखो वाहन चालकांना पोस्टामार्फत ही सुविधा वापरण्याची सोय उपलब्ध होणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकदेखील फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ व्ही. ईश्वरन यांनी मनीकंट्रोलशी साधलेल्या संवादादरम्यान यासंदर्भातील माहिती दिली. पोस्ट पेमेंट बँकेसोबत सातत्यानं मोठ्या प्रमाणात लोक जोडले जात आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ती लाँच केली जाणार असल्याचं ते म्हणाले. या वर्षाअखेरिस नवे ग्राहक जोडण्यासाठी ३० टक्क्यांच्या वाढीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले. आम्ही ८.५ कोटी ग्राहकांची संख्या पार केली आहे आणि हा आकडा वाढता आहे, असंही ते म्हणाले.