Sangli Samachar

The Janshakti News

वसंतदादा घराण्याचे 'कमबॅक' की सागलीत पुन्हा कमळ फुलणार ?





सांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

सांगली - सांगली जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा म्हणून राज्यभर ओळख, पहिल्या लोकसभा निवडणुकीत शेकापचे बळवंत पाटील निवडून आले होते, आणि त्यानंतर १९६२ पासून सन २०१४ पर्यंत सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. सुमारे 40 वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता, अर्थात यापैकी १९८० मध्ये वसंतदादा स्वतः खासदार झाले तिथून पुढे सुमारे चाळीस वर्षे खासदारकी फक्त वसंतदादा घरात राहिलेली होती.

मात्र २०१४ मध्ये काँग्रेसचा हा बालेकिल्ला मोदी नावाच्या लाटेने उद्वस्थ केला. मोदी नावाचं देशभर घोंगावणारं वाट सांगलीत येऊन थडकलं आणि ४० वर्षे अनेक वादळं परतवून लावणारा भरभक्कम किल्ला जमिनदोस्त झाला.  दादांचे नातू केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांना घरी बसवलं. केवळ सांगली व कवठे महांळपुरते मर्यादित असलेल्या संजयकाका पाटील यांनी ६ लाख ११ हजार मते घेऊन प्रतीक पाटील यांना धोबीपछाड दिली.



2019 च्या लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे दुसरे नातू विशाल पाटील यांनी स्वाभिमानी पक्षाचे जुगाड खांद्यावर घेऊन चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु गोपीचंद पडळकर यांनी त्यांना विजयापासून "वंचित" केले. आणि संजय काका दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले.

आता या निवडणूकीत येथील मतदार  दादा घराण्याच्या पाठीशी राहतात की पुन्हा एकदा येथे कमळच फुलते हे भाजपाचा तगडा उमेदवार कोण यावर ठरणार आहे. स्वाभिमानी पक्षाचे महेश खराडे यांनी शड्डू ठोकला असलेले शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहतात की केवळ मध्ये खाण्यासाठी खराडे यांची भूमिका राहते यावरही विजयाचे पारडे कमळ व हाताच्या चिन्हांच्या दोलायमान राहणार आहे.

गेली पाच वर्षे यांना त्या कारणाने विशाल पाटील आपले नाव सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आघाडीवर राहील याची काळजी घेतली आहे. तरुणांच्या खांद्यावर हात ठेवत तर वृद्धांच्या पाया पडत मतदारांच्या हृदयात आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात स्व पक्षातील छुपा विरोध त्यांना कितपत साथ देतो यावर हे स्थान किती बळकट आहे हे आगामी निवडणुकीत निश्चित ठरेल.

तोपर्यंत राजकारणाचे वारे कसे वाहते यावरही बरीच गणिते अवलंबून असल्याने निकाल दादा घराण्याच्या बाजूने राहतो की भाजपच्या हेही ठरवून जाणार आहे