सांगली समाचार दि. १२|०२|२०२४
सांगली - राष्ट्रीय महामार्ग पेठ-सांगली रस्त्याचे सुरू असलेल्या रुंदीकरणादरम्यान कसबे डिग्रज येथे उभारण्यात येणार असलेल्या टोल नाक्याला कसबे डिग्रज येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. नियोजित टोल नाक्यासाठी येथील ३० ते ४० शेतकऱ्यांच्या ११ एकर जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाकडून जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न चालू होता.
यासंदर्भात शेतकऱ्यांची व अधिकाऱ्यांची कसबे डिग्रज (ता, मिरज) येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी, 'रस्त्याला विरोध नाही. पण टोलनाक्यास जमीन अधिग्रहण करू देणार नाही,' असे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
या वेळी अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न पाठवता जमीन अधिग्रहण करण्यासंदर्भातचे खांब शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये रोवले होते.
त्यानंतर त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत यासंदर्भात म्हणणे मांडत जमीन अधिग्रहणास विरोध केला आहे. राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर कार्यालयातील उपअभियंता प्रकाश शेडेकर, कनिष्ठ अभियंता जितेश पाटील यांच्याह अन्य अधिकारी उपस्थित होते.
'कोणतीही नोटीस न देता तुम्ही जमीन कशी काय अधिग्रहण करू शकता, 'असे प्रश्न या अधिकाऱ्यांना विचारले. 'या आधी ग्रहणासंदर्भातची नोटीस कमी खप असलेल्या व गावात विक्री होत नसलेल्या वृत्तपत्रांमध्ये कशी काय छापली,' असा सवाल उपस्थित केला.
'टोल ऑनलाईन घेणार आहात, तर ११ एकर जागेचे अधिग्रहण कशासाठी? जमीन अधिग्रहणामुळे काही शेतकरी ७/१२ वरूनच कमी होणार आहेत. त्यांच्यासाठी तुमची भूमिका काय,' असे प्रश्न विचारले. यावेळी अधिकाऱ्यांनी, 'तुमचे प्रश्न वरिषठ अधिकाऱ्यांकडे पोहोचवतो,' असे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, सरपंच रियाज तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य धीरज गोपुगडे, शेतकरी संतोष गोपुगडे, प्रवीण गोपुगडे, सूरज गोपुगडे, प्रसाद मेहता, मोहन भोकरे, शंकर पोतदार, सुनील येळावीकर, ज्ञानदेव कामेरीकर, सुहास शिंदे, अशोक मुळीक उपस्थित होते.