सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
अमरावती - विदर्भाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अखेर ठरले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा अमरावती आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये मनसे मैदानात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने बैठक आणि इतर हालचाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुरू केल्या आहेत. यामध्ये शनिवारी सायंकाळी शेगावात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर उंबरकर यांनी ही घोषणा केली.
मनसेची मागील महिन्याभरापासून राज्यातील लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकी पार पडत आहे. या बैठकीत लोकसभेच्या 22 जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावरदेखील शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतर आता पक्षाने नियोजनासाठी विदर्भाकडे आपला मोर्चा वळविला असून याची सुरुवात शनिवारी संत नगरी शेगावातून करण्यात आली. मनसेच्या पार पडलेल्या बैठकीनंतर विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि चंद्रपूर या तीन ठिकाणी मनसे लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे मनसे नेते राजू उंबरकर यांनी जाहीर केले.