yuva MAharashtra १०० वर्षे अव्याहतपणे कीर्तन होणारा सांगली येथील प.पू. केळकर महाराजांचा मठ आणि त्या निमित्ताने होत असलेला कीर्तन शताब्दी महोत्सव !

१०० वर्षे अव्याहतपणे कीर्तन होणारा सांगली येथील प.पू. केळकर महाराजांचा मठ आणि त्या निमित्ताने होत असलेला कीर्तन शताब्दी महोत्सव !

 



सांगली समाचार  - दि. १३|०२|२०२४

सांगली - महाराष्ट्राला साधू-संत यांची मोठी परंपरा आहे. संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे, कीर्तनामुळेच या भूमीत सात्त्विकता, अध्यात्म टिकून आहे. अशाच प्रकारे गेली १०० वर्षे सातत्याने कीर्तनाच्या माध्यमातून अव्याहतपणे समाजाला भगवत्भक्तीची गोडी लावणारा, भक्तीच्या रसात डुंबायला लावणारा प.पू. केळकर महाराज यांचा परिवार आणि त्यांचे गावभाग येथे असलेले श्रीरामनिकेतन होय !

वर्ष १९२४ पासून या घराण्यात गेल्या ४ पिढ्या कीर्तनाची परंपरा चालू आहे. श्रीरामनिकेतन येथे अनेक संत-महंत, प्रवचनकार, कीर्तनकार यांचे चरणस्पर्श झाले आहेत. येथे कीर्तन शताब्दी महोत्सव १३ फेब्रुवारीपासून चालू होत आहे ! या महोत्सवाच्या निमित्ताने प.पू. केळकर महाराज यांच्या घराण्याची परंपरा आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी येथे देत आहोत !

प. पू. सद्गुरु श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांचा अखंड कीर्तनासाठी मिळालेला आशीर्वाद आणि चार पिढ्यांचे व्रत !

प.पू. सद्गुरु श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांनी सांगलीत अखंडपणे २५ वर्षे कीर्तन केले. प.पू. सद्गुरु श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांनी पौष वद्य ६ (वर्ष १९२४) या तिथीला देह ठेवला. त्यानंतर प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज तथा श्री. गोविंद अनंत केळकर यांच्या मनात 'प.पू. कोटणीस महाराज यांच्याप्रमाणे आपल्या हातूनही अखंड कीर्तनसेवा व्हावी', असा विचार आला. त्याप्रमाणे प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांनी माघ शुक्ल १ (वर्ष १९२४) या दिवशी कीर्तन चालू केले. त्यानंतर लगेचच २ दिवसांनी म्हणजे माद्य शुक्ल तृतीयेच्या (वर्ष १९२४) रात्री १२ वाजता प.पू. सद्गुरु श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस साक्षात् प्रकट झाले. त्यांना प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांनी नमस्कार केला. ''मामा महाराज तुमची काय इच्छा आहे ?'', अशी विचारणा केली. यावर प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज केळकर यांनी 'आपली सेवा म्हणून मी कालच्या प्रतिपदेपासून कीर्तन चालू केले आहे. ते कीर्तन अखंड चालावे एवढीच इच्छा आहे', अशी प्रार्थना केली. यावर प.पू. सद्गुरु श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांनी 'बापूराव तुमचेही कीर्तन अखंडत्वाने चालेल', असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून हे कीर्तन केळकर घराण्यात अखंडपणे चालू आहे.




 चिमड संप्रदायाची गुरु-शिष्य परंपरा

मामा महाराज यांनी शेवटच्या काळात प्रकृती अतीगंभीर असतांनाही अखेरच्या श्वासापर्यंत वर्ष १९६२ पर्यंत, म्हणजे ३८ वर्षे अखंड कीर्तन केले. हाच वारसा पुढे त्यांचे पुत्र तथा प.पू. सद्गुरु श्री दासराम महाराज तथा श्री. रामराव गोविंद केळकर यांनी वर्ष २००१ पर्यंत अखंडपणे ३९ वर्षे चालवला. यानंतर त्यांचे सुपुत्र श्री. चंद्रशेखर रामराय केळकर तथा श्री अण्णा महाराज यांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे २०२० पर्यंत (१९ वर्षे) हे कीर्तन केले. श्री अण्णा महाराज यांचे वर्णन अनेक संतांनी 'विनम्र प्रतिमा आणि निर्मळ अभिव्यक्ती', असे केले आहे. त्याही पुढे जाऊन आता श्री अण्णा महाराज यांचे चिरंजीव ह.भ.प. दीपक केळकर महाराज हे चौथ्या पिढीत कीर्तनाचा वारसा चालवत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. प्रज्ञा दीपक केळकर यांचीही भावपूर्ण सेवा तिथे सतत रूजू होत आहे.

केळकर महाराज मठात श्रीराम-सीता यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा मूर्ती आहेत. या मूर्ती ज्यांच्याकडे होत्या, त्या व्यक्तीला जमखिंडला दृष्टांत झाला की, 'मला बाहेर काढ आणि सांगलीला प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांच्याकडे पोचते कर.' यानंतर या व्यक्तीने सांगलीत येऊन प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज केळकर यांची भेट घेऊन त्या संदर्भातील माहिती दिली. ही माहिती दिल्यावर प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांनी श्री. खाडिलकर यांना जमखिंडीला जाऊन या मूर्ती घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे श्री. खाडिलकर हे चालत गेले आणि डोक्यावर या मूर्ती ठेवून सांगली येथे घेऊन आले. या मूर्ती 'गारे'च्या असून त्यांची स्थापना प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज केळकर यांनी केली आहे.

समर्थ रामदासस्वामी यांना वेणास्वामी म्हणाल्या, ''मी बाईमाणूस आणि मोगलांच्या राज्यात माझे रक्षण कोण करणार ?'' तेव्हा समर्थांनी स्वत:च्या हाताने एक मारुतीची मूर्ती कोरली आणि ती वेणास्वामींना देऊन म्हणाले, ''हा मारुति तुझे रक्षण करील.'' ही मारुतीची मूर्ती वर्ष १९४९ पर्यंत मिरज येथील मठात होती. यानंतर त्या वेळी मठाधिपती असलेल्या रामचंद्रबुवा रामदासी यांना या मारुतीने दृष्टांत दिला, 'माझे येथले काम संपले असून सांगलीला असलेल्या प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांच्याकडे मला घेऊन चल.' मधल्या काळात प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज केळकर यांनी साडेतीन कोटी श्रीरामनाम जप पूर्ण केला होता आणि 'त्याचे पुन:श्चरण कसे करायचे ?', असा विचार करत असतांनाच रामचंद्रबुवा रामदासी हे प.पू. सद्गुरु श्री मामा महाराज यांच्याकडे आले. त्यामुळे 'ही मूर्ती म्हणजे प्रभु श्रीरामांनी दिलेला प्रसादच आहे', असे लक्षात घेऊन त्यांनी केळकर मठात ही मूर्ती स्थापन केली.