सांगली समाचार - दि. १७|०२|२०२४
हातकणंगले - हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची बाजू भक्कम वाटत असताना शेट्टींना धैर्यशील माने यांनी चॅलेंज दिले आहे. खरपूस शब्दांमध्ये धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा समाचार घेतला.
हातकणंगले मतदारसंघात माने कुटुंबाने आजपर्यंत ११ निवडणुका लढल्या असून, आठ वेळा जिंकल्या आहेत. संघर्षांतूनच आमची वाटचाल राहिली आहे. त्यामुळे यावेळेस आम्हाला कोणाचे आव्हान वाटत नाही. मागील वेळी या छोट्या पहिलवानानं त्यांना अस्मान दाखवलं होतं. हवा भरलेल्या फुग्याला फोडण्यासाठी साध्या पिनची गरज असते. मी पिन होऊन त्यांचा फुगा फोडेन, अशा शब्दांत खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना चॅलेंज दिले आहे.
खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाले. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेऊ न देण्याचा इशारा दिला होता. तसेच उद्धव ठाकरेंकडून शेट्टी यांना ताकद दिली जात आहे, यावर माने यांनी भाष्य केले.
धैर्यशील माने म्हणाले, आगामी लोकसभेसाठी माझ्या विरोधात पहिलवान कोण यापेक्षा तुम्ही काय करता हे महत्त्वाचे आहे. मागील वेळी याच लहान दिसणाऱ्या पहिलवानाने त्यांना अस्मान दाखवलं होतं. ते जो डाव टाकतील त्याला प्रतिडाव टाकला जाईल. लोकशाहीत कोण मोठा कोण छोटा असं असत नाही. हवेने भरलेला फुगा कितीही मोठा असला तरी त्याला फोडायला एक साध्या पिनची गरज असते. कदाचित मी साधी पिन होऊन फुगा फोडण्याचे काम केले तरी लोकसभेला वेगळा निकाल सांगायची गरज नाही.