सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
रायगड - सत्तेच्या लालसेने विरोधी विचारसरणी असलेली राजकारणी एकत्र आले. पण भिन्न असलेली विचारसरणी एकमेकांना पटणार का ? असा अहवाल अजित दादांच्या राष्ट्रवादीने केलेल्या ठरावावरून आता विचारला जाऊ लागला आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून, समाजापर्यंत आपला अजेंडा पोहोचवला जात आहे. आणि हाच अजेंडा एकमेकांना घातक ठरेल की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अल्पसंख्यांकांना विशेष आरक्षण दिले जावे, त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव यावेळी झाला. जातनिहाय जनगणनासंदर्भात भाजपशी विरोधी भूमिका यावेळी घेण्यात आली. त्यामुळे अजित पवार यांच्या या मेळाव्यातील ठरावास भाजपचे समर्थन मिळणार की विरोध होणार ? यावर चर्चा सुरु झाली आहे.
कोणकोणते ठराव झाले समंत ?
अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्ष आणि पक्षाचे चिन्ह मिळाल्याबद्दल त्यांचा अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती वाढवून १००० कोटी केल्याबद्दल अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच महिला बचत गटांना आता तारण ठेवावे लागणार नाही. ती अट काढून टाकण्यात आली आहे. यासाठी अजित पवार यांचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला.
अल्पसंख्यांक आरक्षण
अल्पसंख्यांकांच्या विशेष आरक्षण दिले जावे. त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हावी, हा अधिवेशनातील ठराव कळीचा मुद्दा ठरणार आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचा या दोन्ही विषयांना विरोध आहे. अल्पसंख्यांकांना नोकरी, शिक्षण राजकारणात आरक्षण मागणी राष्ट्रवादीच्या ठरावात करण्यात आली.
‘मार्टी’ची स्थापना करण्याची मागणी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बार्टीच्या धरर्तीवर ‘मार्टी’ची स्थापना करावी, असा ठराव संमत करण्यात आला. ‘मार्टी’च्या माध्यमातून अल्पसंख्याकांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली. महिलांना शिक्षणापासून वंचित राहू नये. म्हणून महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र वसतीगृह असावे. कबरीस्तान आणि ईदगाह यावर अतिक्रमण होऊ नये, म्हणून संरक्षण भिंत शासनाने बांधून द्यावी तसेच उर्दू शाळेत शिक्षक भरती केली जावी, असे ठराव करण्यात आले.