सांगली समाचार दि. ०९|०२|२०२४
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सुमारे ९७ टक्के मतदार हे पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर २ कोटी तरुणांनी पहिल्यांदाच मतदार नोंदणी केली आहे. हे नवमतदारच निवडणुकीत मोठा बदल घडवून आणू शकतात.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेवढे पात्र मतदार होते त्यात ६ टक्के मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये १८ ते २९ वयोगटातील जे नव मतदार आहेत, त्यांचं मतदान हे महत्वाचं मानलं जात आहे. कारण त्यांच्या मतदानामुळं लोकसभेतील चित्र वेगळं दिसू शकतं.
निवडणूक आयोगानं नुकतेच नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 96.88 कोटी मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे. म्हणजे यंदाच्या निवडणुकीत १८ पासून पुढील वयाचे सुमारे ९७ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते २९ या वयोगटातील २ कोटींहून अधिक नवीन मतदार आहेत.