yuva MAharashtra फेसबुक-इंस्टाग्रामचा होतोय तरुणांच्या मेंटल हेल्थवर परिणाम?

फेसबुक-इंस्टाग्रामचा होतोय तरुणांच्या मेंटल हेल्थवर परिणाम?

 


सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

नवी दिल्ली - सध्याच्या पिढीला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. झोप न येणे, कामावर लक्ष केंद्रीत न करू शकणे अशा अनेक समस्यांचा तरुणांना सामना करावा लागत आहे. जगभरात मानसिक आरोग्य हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील तब्बल १२ टक्के लोकांना मेंटल आणि बिहेवियरल समस्या आहेत. 

भारतातील १००० पैकी १०० लोक मेंटल हेल्थ संबंधी समस्यांचा सामना करत आहे. आरोग्य विषयक तज्ज्ञ या समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. या मेंटल हेल्थ इश्यूज दरम्यान न्यूयॉर्कच्या महापौरांनी सोशल मीडिया कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे. या खटल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की प्रशासनाने तरुणांमध्ये मानसिक समस्यांना वाढवण्यासाटी मेटा प्लॅटफॉर्मचे फेसबुक आणि इंस्टाग्राम यांच्यासह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे.

कॅलिफोर्निया सुपीरियर कोर्टात दाखल केलेल्या या खटल्यात अल्फाबेट कंपनीचे यूट्यूब, स्नॅप इंकची स्नॅपचॅट आणि बाइटडांसच्या टीकटॉकचा देखील समावेश आहे. या कंपन्यांवर आरोप करण्यात आला आहे की, त्या जाणीवपूर्वक आपले प्लॅटफॉर्म असे डिझाइन करतात की जेणेकरून लहान मुले आणि तरुणांना या सोशल मीडियाची सवय लागते. हे सर्व प्लॅटफॉर्म लहान मुलांवर वाईट परिणाम होण्यासाठी जबाबदार आहेत.

न्यूयॉर्कमधील शेकडो शाळा आणि आरोग्य संघटनांनी एकत्र येत मेंटल हेल्थच्या समस्येविरोधात पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. याअंतर्गतच सोशल मीडिया कंपन्यांविरोधात खटला दाखल करम्यात आला आहे. साधारणपणे न्यूयॉर्क शहर तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठीच्या मोहिमेवर वर्षाला १०० मिलियन डॉलर्सहून अधिक खर्च करते. याचा उद्देश मुलांना मानसिक समस्यांपासून दूर ठेवणे हा आहे.