Sangli Samachar

The Janshakti News

११ हजार शिक्षकांची नियुक्तीसाठी शिफारस; अनेक वर्षांनंतर शिक्षक होण्याचे स्वप्न साकार

सांगली समाचार  - दि. २६|०२|२०२४

मुंबई  - राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांच्या २१ हजार ६७८ पैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणी करीत शाळांवर नियुक्ती दिली जाणार आहे अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. मागील अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

मुलाखती शिवाय १६ हजार ७९९ मधील ५ हजार ७१७ पदांसाठी शिफारस केलेली नाही. आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (१५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे २ हजार ३५७ जागा व अंशकालीन (१० टक्के) उमेदवार नसल्यामुळे १५३६ जागा तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. पहिल्या टप्यात पवित्र पोर्टलवर दि.१६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत नोंद केलेल्या जिल्हा परिषद -१२ हजार ५२२, मनपा-२ हजार ९५१, नगरपालिका-४७७, खाजगी शैक्षणिक संस्था- ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती आल्या आहेत. मुलाखतीशिवाय - १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही होणार आहे. 

एकूण १ हजार १२३ खाजगी शैक्षणिक संस्थांनी ५ हजार ७२८ रिक्त पदासाठी पवित्र पोर्टलवर मागणी नोंदविली आहे. जाहिरातीच्या अनुषंगाने दि.५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी संस्थांसाठी १ लाख ३७ हजार ७७३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. तर मुलाखतीसह पदभरती याप्रकारातील संस्थासाठी १ लाख ३३ हजार २७७ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.

उमेदवार उपलब्ध न झाल्याने दुसरी फेरी 

विषयाचा विचार करता इ.१ ली ते इ ५ वी इंग्रजी माध्यम-१ हजार ५८५, मराठी माध्यम-८७०, उर्दू माध्यम- ६४० जागा व इ. ६ वी ते इ ८ वी गटातील गणित-विज्ञान- २ हजार २३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. पहिल्या फेरीत समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दूसरी फेरी घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय मधील जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जातील.

मुलाखतीसह पदभरती साठी ४ हजार ८७९ उमेदवार 

सदर मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या १ हजार १८९ संस्थांना ४ हजार ८७९ रिक्त पदासाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्या आधारे निवड केली जाईल यासाठी ३० गुणांची तरतुद केली असून उमेदवाराची निवड संस्था करणार आहे.

कागदपत्रे पडताळणीनंतर नियुक्ती 

उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल व पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१ जून २०२३ मधील तरतुदीनुसार समूपदेशन पध्दतीने नियुक्ती आदेश दिले जातील, त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल. काही उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी करणे गरजेचे आहे अशा उमेदवारांना योग्य त्या पडताळणीनंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही नियुक्ती होणार आहे.