सांगली समाचार - दि. २८|०२|२०२४
हिंद केसरी मारुती माने यांचा आज जन्मदिन
जन्म. २८ फेब्रुवारी १९२७ सांगली जवळच्या कवठेपिरान ( ता. मिरज ) या छोट्याशा गावात झाला.
मारुती माने यांनी १९६२ मध्ये जकार्ता इथे झालेल्या आशियाई स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानंतर १९६४ मध्ये पंजाबच्या कर्नाल येथे झालेल्या अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत हिंद केसरीचाही बहुमान त्यांनी पटकावला होता. त्यांची कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना १९८१ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले होते.
मारुती माने ज्या काळात मोठे झाले, त्या काळात कोल्हापूरचे नाव कुस्तीसाठी घेतले जायचे. कुस्तीचे आखाडे गाजविणारे अनेक मल्ल कोल्हापुरातच होते आणि त्यांनी आपल्या कुस्तीमुळे त्या कलानगरीला एक वेगळा बाज आणून दिला होता. माने यांचे वैशिष्ट्य असे की आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कुस्तीचे केंद कोल्हापुरातून सांगलीकडे वळविले. हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीतील ब्राँझ पदक मिळविणारे खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीमुळे स्वत:चे नाव सर्वतोमुखी करणारे मारुती माने हेच नामवंत पैलवान होत.
सर्वसाधारण मराठी माणसाच्या तुलनेत त्यांना सणसणीत उंची आणि तिला साजेल अशी भरदार शरीरयष्टी लाभली होती. हे शरीर त्यांनी अखंड मेहनत करून मिळविले होते. मैदान मारण्यामध्ये नाव मिळविणाऱ्या अनेकांना आपल्याला मिळालेले यश पचवता येत नाही. अनेकदा त्याची परिणती मैदानी जीवनाला अतिशय विसंगत अशी जीवनशैली स्वीकारण्याकडे होते. साहजिकच अशा लोकांना मैदाने विसरावी लागतात आणि अल्पकाळातील चमकदार कामगिरीच्या रम्य आठवणींवरच दिवस काढावे लागतात.
मारुती माने यांच्याबाबतीत असे घडले नाही; कारण त्यांच्या लाल मातीशी असलेल्या निष्ठा अतिशय पक्क्या होत्या आणि त्यांना साजेसेच त्यांचे जीवन होते. त्यामुळेच त्यांनी उणेपुरे एक दशक देश-परदेशांतील कुस्तीचे आखाडे गाजविले. हिंदकेसरी किताब पटकाविला आणि कुस्तीची कला शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रशिक्षित केले. राजकारणाच्या सावलीमध्ये ते गेले नसते तर कदाचित त्यांच्या हातून कुस्तीच्या क्षेत्रासाठी अधिक भरीव असे कार्य घडूही शकले असते, असे काहीजण म्हणतात. परंतु राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतरही माने पैलवानकी विसरले नाहीत किंवा उत्साही, मेहनती आणि जिद्दी तरुणांना शिकविण्यामध्ये कमी पडले नाहीत.
अलीकडच्या काळामध्ये ज्यांना नजरेत भरेल अशी उंची आणि भरदार शरीरयष्टी लाभलेली असते अशा मैदानीवीरांना सिनेमात कामे करण्याबाबत विचारणा होते आणि बहुतेक सर्वचजण त्या रंगीत पडद्याच्या मोहाने तिकडे वळतातसुद्धा. त्यामुळे मिळणारी प्रसिद्धी ही क्षणभराची असते. अशा कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले. लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरीवादनातून व्यक्त होत राहिला. मारुती माने यांचे २७ जुलै २०१० रोजी निधन झाले.
- चंद्रकांत राजाराम क्षीरसागर
कार्य. संपादक,
ई-दैनिक सांगली समाचार.