सांगली समाचार - दि. २९|०४|२०२४
मुंबई - सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. राज्यात सर्वाधिक कमी पाऊस झालेला हा जिल्हा आहे . जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. निम्म्यापेक्षा जास्त जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ या योजनांचे आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे, पिण्यासाठी व शेतीसाठी वेळेत पाणी मिळावे, अशी मागणी माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी विधान सभागृहात केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.
आमदार कदम म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे, परंतु सांगली जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या दुष्काळी तालुक्यांमध्ये तर खूपच बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या मार्च महिना सुरू होणार आहे. पुढे एप्रिल, मे महिना कडक उन्हाळ्याचे आहेत. जून महिन्यात मागील काही वर्षात सांगली जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. कोयनेचा विसर्ग पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे, त्याचे योग्य नियोजन व्हावे. तर टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या तिन्ही सिंचन योजनांचे अवर्तनाचे नियोजनही योग्यरीत्या व्हावे, असे ते म्हणाले.
सिंचन योजनांच्या आवर्तनबाबत सूचना देणार
विधानसभेत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केलेल्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणी मान्य करीत दुष्काळाच्या परिस्थिती लक्षात घेता सांगली व सातारा या दोन्ही जिल्ह्यात कोयनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे सांगितले. तसेच कालवा समितीच्या बैठकीत टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या तिन्ही सिंचन योजनांचे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन वेळेत दिले जाईल, अशा सूचना देण्यात येतील, असे सांगितले.