सांगली समाचार दि. ०९०२|२०२४
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे राम मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा झाला. यानंतर आता बाजारात सुंदर आणि विशाल राम मंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित अनेक वस्तू दाखल झाल्या आहेत. जसे की, लाकूड, दगड आणि धातूनंतर आता सोन्या-चांदीचे राममंदिराचे मॉडेल आणि चांदीच्या नाण्यांनी बनवलेले राममंदिराचे मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. मात्र, यासोबतच आणखी एक अनोखी वस्तू बाजारात आली आहे. सर्वांना ही वस्तू आपल्याकडे आकर्षित करत आहेत. ही वस्तू काय आहे, याची किंमत किती आहे, हे जाणून घेऊयात.
राम मंदिराच्या मॉडलमध्ये बनलेली सोन्याची अंगठी बाजारात दाखल झाली आहे. दिल्लीतील चांदनी चौकातील एका ज्वेलरने ही अंगठी बनवली आहे. या ज्वेलर्सचे नाव वाय के ज्वेलर्स असे आहे.
येथील संचालक योगेश सिंगला यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करताना त्यांनी आपल्या कलेचा वापर करून ती अंगठीच्या रूपात बनवून लोकांसमोर आणली. लोक ते भेटवस्तू म्हणून एकमेकांना देऊ शकतात आणि ते कायमचे स्मृती म्हणून ठेवू शकतात.
योगेश यांनी सांगितले की, अंगठीचे पहिले मॉडेल 22 कॅरेट सोन्याचे आहे. या अंगठीचे वजन 22 ग्रॅम आहे. तसेच या अंगठीची किंमत दीड लाख रुपये आहे. ही अंगठी बनवण्यासाठी 20 दिवस लागले. ही अंगठी तुमच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड करता येते. तसेच कमी वजनातही बनवता येते.