yuva MAharashtra पोलीस असल्याची बतावणी करत लुटणाऱ्या दोघांना अटक

पोलीस असल्याची बतावणी करत लुटणाऱ्या दोघांना अटक


सांगली समाचार  - दि. २३|०२|२०२४

सांगली - पोलीस असल्याची बतावणी करत मिरजेतील हातचलाखी करून वृद्ध व्यक्तीची साडेसात तोळे वजनाची सोनसाखळी लंपास करणार्‍या दोन भुरट्या चोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवारी कोल्हापूर रस्त्यावर अंकली फाटा येथे अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर रणजितसिंग सुल्ह्यान हे चालले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून आम्ही पोलीस आहोत, गळ्यातील सोनसाखळी खिशात ठेवा असे सांगत हातचलाखी करून साडेसात तोळ्याची सोनसाखळी लंपास केली होती. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार सागर लवटे यांना मिळालेल्या माहितीनुसार परजिल्ह्यातील दोघेजण युनिकॉर्न दुचाकीवरून अंकली फाटा येथे येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दुचाकीवरून आलेल्या कंबर रहीम मिर्झा (वय ३७) आणि जाफर मुख्तार शेख (वय ३३, दोघेही रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ लाख ५० हजार रूपयांची लंपास करण्यात आलेली सोनसाखळी मिळाली. दोघांनाही पोलीसांना अटक केली असून वापरलेली दीड लाख रूपयांची दुचाकीही जप्त केली आहे.