yuva MAharashtra माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा निर्घृण खून

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा निर्घृण खून



सांगली समाचार दि. ०८|०२|२०२४

सांगली - येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू कदम (वय वर्षे ३७) याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आल्याने सांगलीत मोठी खळबळ उडालेली आहे.

कुरुंदवाड नांदणी मार्गावर एका शेताजवळ उभ्या असलेल्या मारुती स्विफ्ट कारमध्ये (गाडी क्रमांक MH 09 AB 806) एका तरुणाचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली. तेव्हा कुरुंडवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणवीस हे आपल्या फोजफाट्यासह तेथे पोहोचले. सदर गाडीमध्ये पुढील सीटवर एक तरूण रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याच्याकडील कागदपत्रे तपासली असता हा तरुण सांगली येथील संतोष विष्णू कदम असल्याचे उघडकीस आले. यानंतर त्यांनी श्वानपथक व ठसेतज्ञाना पाचारण केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.




संतोष कदम हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता. तो सांगली महापालिका व इतर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकारात माहिती घेत होता. कदम याच्यावरही मध्यंतरी काही गुन्हे दाखल झाले होते . त्याचे काही माजी नगरसेवकांशीही हाडवैर होते. संतोष कदम याचा खून याच कारणास्तव झाला की यासाठी आणखी कुठले कारण आहे याबाबत सांगली शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.