सांगली समाचार दि. १०|०२|२०२४
सांगली - सांगली लोकसभेसाठी भाजपमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यातच सांगलीत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने संजयकुमार व पृथ्वीराज देशमुख यांचे टेन्शन वाढले आहे.
देशाचा विकास आणि उज्वल भविष्यासाठी महायुतीकडून सांगलीला जो कोण उमेदवार लोकसभेला असेल, त्यांच्या पाठीशी आपल्याला राहावे लागेल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी केलेले वक्तव्य मात्र विद्यमान खासदार संजयकाका आणि इच्छुक असणारे देशमुख यांचे टेन्शन वाढवणारे आहे.
सांगली आणि मिरज शहरात विकासकामांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, चालू वर्षी सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगला वाटा द्यायचा आहे. देशाचा विकासासाठी महायुतीकडून जो कोण उमेदवार लोकसभेला असेल, त्यांच्या पाठीशी आपल्याला राहावे लागणार आहे. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित भाजप नेत्यांच्याही भुवया उंचावल्या.
सांगलीमध्ये भाजपचे खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. असे असताना मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत खासदार पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले. मात्र, बावनकुळे यांनी हे महायुतीचे कार्यालय असल्याचे जाता-जाता सांगितले. त्यामुळे सांगली लोकसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असल्याचे चित्र होते.
लोकसभेसाठी विद्यमान खासदार पाटील यांना आव्हान देत माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडेही देशमुख यांनी लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली आहे. विद्यमान खासदार पाटील आणि देशमुख हे दोघेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करीत करीत आहेत. खासदार पाटील यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट् ट्रिक मारण्याचा चंग बांधला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी उमेदवारीवरून केलेल्या वक्तव्याने संजयकाका आणि देशमुखांचे टेन्शन वाढल्याची चर्चाही सुरू झाली आहे.