yuva MAharashtra रेशन कार्डधारकांनो ही काळजी घ्या; अन्यथा तुमचे रेशन कार्ड होऊ शकते रद्द

रेशन कार्डधारकांनो ही काळजी घ्या; अन्यथा तुमचे रेशन कार्ड होऊ शकते रद्द



सांगली समाचार  - दि. १७|०२९२४

मुंबई : शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हे गरिब कुटुंबांसाठी मोठा आधार ठरते. रेशनकार्डच्या माध्यमातून अल्पदरात धान्य मिळत. राज्य व केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी शिधापत्रिकांऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रचालकांना लवकरच या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अधून मधून समोर येत असतात. यासह काही शिधापत्रिका धारक मुळ पत्यावर राहत नसल्याने त्यांना ध्यान्य मिळत नाही. यामुळे गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. मात्र यातही आता बदल करण्यात आले आहेत.

तुम्हाला अशी मिळवता येईल ई-शिधापत्रिका

पुढील काळात ई-शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही अशा नागरिकांना सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.