सांगली समाचार - दि. २४|०२|२०२४
मिरज - बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. संशयिताकडून तीन गुन्हें उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड असा दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. पोलिसांनी विठाबाई नितीन चौगुले (वय ५०), नगिना सागर चौगुले (वय ४०, दोघीही रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सावित्री सैदू लोढे (वय ५०, रा. कागवाड, जि. बेळगाव) आदिना अटक केली आहे. मिरजेतील बसस्थानकावर चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
हे पथक चोरट्यांचा शोध घेत असताना, मिरजेतील बस स्थानकातून चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी तीन महिला छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात थांबल्याची माहिती पत्थकाला मिळाली. पथकातील महिला पोलिसांनी तिघींची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे रुमालात गुंडाळलेले दागिने आढळले. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मिरज बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पिशवी, पर्समधील दागिने चोरल्याची कबुली दिले त्यानंतर त्यांना अटक करून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, आमसिद्ध खोत, अमोल लोहार बाबासाहेब माने शुभांगी मुळीक सपना गराडे कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.