सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
नवी दिल्ली - चार लोक एकत्र आल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या की एखाद्याच्या हातात आपसूक स्मार्टफोन प्रकट होतो. सभासमारंभाच्या ठिकाणीही मोबाईलमध्ये डोके घातलेली माणसे आपणास पहावयास मिळतात. दिवसभरात प्रत्येक जण थोडासा जरी वेळ मिळाला की, हातात मोबाईल घेऊन सोशल मीडियावर कार्यरत होतो. लोकं स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत. पण लोकांचं स्मार्टफोनमध्ये गुतलेलं प्रमाण किती ? ठाऊक आहे ?
याची आकडेवारी खूप वेगवेगळी आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने याबाबत एक सर्व्हे केला आहे. ज्याची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या अहवालानुसार भारतातील ८४ टक्के लोक सकाळी उठल्या उठल्या १५ मिनिटांच्या आत आपला स्मार्टफोन तपासतात. तसेच दिवसभरातला ३१ टक्के वेळ लोक स्मार्टफोनवर घालवतात आणि दिवसांतून सरासरी ८० वेळी लोक आपला मोबाइल तपासतात.
मोबाईलवर घालवणारा वेळ वाढला
स्मार्टफोनवर घालविण्यात येणाऱ्या वेळेतही वाढ झाल्याची आकडेवारी अहवालातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. २०१० साली सरासरी दोन तास स्मार्टफोनवर घालवले होते, त्यात वाढ होऊन आता ४.९ तासांचा वेळ स्मार्टफोनवर घालवला जातो. विशेष म्हणजे २०१० साली, मोबाइलवर बोलणे किंवा मजकूराच्या रुपातील संदेश पाठविण्यासाठी १०० टक्के वेळ वापरला जात होता. मात्र २०२३ मध्ये बोलणे आणि मेसेज करणे यासाठी फक्त २०-२५ टक्के वेळ वापरला जातो. स्मार्टफोनच्या वापराबाबत समाजीकरणाने दुसरे स्थान पटकावले आहे. त्यानंतर सर्चिंग, गेमिंग, शॉपिंग, ऑनलाईन व्यवहार आणि बातम्यांचा क्रमांक लागतो. १८-२४ वयोगटातील मुलं ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपेक्षा इन्स्टाग्राम रिल्स, यूट्यूब शॉर्ट्स इत्यादीसारख्या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ पाहण्यात जास्त वेळ दवडत असल्याचे दिसत आहे.
गरजेपेक्षा जास्तवेळा मोबाईल हाताळला जातो
या अहवालात असेही दिसून आले की, दोनपैकी एक वेळा गरज नसताना लोक सवयीमुळे त्यांचा फोन उचलून पाहत असतात. स्मार्टफोनचे लोकांच्या जीवनातील महत्त्व वाढल्याचे अधोरेखित करताना अहवालात असे म्हटले की, चावी किंवा पाकिटापेक्षाही आता मोबाइल अधिक महत्त्वाचा झाला आहे. तसेच भारतात डेटा पॅक स्वस्त झाल्यामुळे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पेक्षाही अधिक प्रमाणात स्मार्टफोनवर इंटरनेट वापरले जात आहे.
.