सांगली समाचार - दि. २२|०२|२०२४
इस्लामपूर - आज देशात स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यांना गुलाम करण्याचा डाव आखला जात आहे. प्राथमिक शाळा बंद करून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. यासाठी आता स्त्रियांना जागृत करून स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळ नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार कासेगाव येथील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात भरलेल्या स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीच्या परिषदेत करण्यात आला.
श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात विविध चळवळी, कष्टकरी जनतेच्या चळवळी चालू आहेत. यामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. या स्त्रियांच्या वतीने तीन जिल्ह्यांतील स्त्रियांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. नागमनी राव होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, ८० च्या दशकात राज्यभर मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या चळवळी सुरू होत्या. परित्यक्ता स्त्रियांना स्वतंत्र रेशन कार्ड, घर, पोटगी, घरामध्ये पुरुष आणि स्त्री यांनी समान काम करणे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आंदोलने चालू होती. आता पुन्हा पुरुषांच्या सोबतीने चळवळ सुरू केली पाहिजे.
यावेळी चंद्रपूरवरून आलेल्या सुजाता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक ज्योती निकम यांनी केले. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत यांनी स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीच्या ठरावाविषयी स्पष्टीकरण केले आणि पुढील काळात स्त्रियांच्या विषयी खास घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबतीत मार्गदर्शन केले.
परिषदेस वैशाली जांभळे, ममता भातुसे, सरिता आरगडे, आशा आरगडे, इंदुबाई थोरवडे, सुषमा कांबळे, अनिता देसाई, पार्वती देसाई, संजना डांगरे, चंद्रकला नांगरे, यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो स्त्री कार्यकर्त्या उपस्थित होत्या.