सांगली समाचार दि. ०८|०२|२०२४
नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
2025 मध्ये इस्रोचे मुख्य मिशन गगनयान लाँच होणार असून त्याआधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ, जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुार, सध्या भारत आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या तयारीत व्यस्त आहे.
इस्रो अंतराळात रोबोट पाठवण्यासाठी सज्ज
इस्रो अंतराळात रोबोट पाठवणार आहे. या रोबोचं नाव व्योमित्र आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने संस्कृत शब्द व्योम आणि मित्र एकत्र करून रोबोटला व्योमित्र असं नाव दिलं आहे. व्योमित्र रोबोला मानवी शरीराप्रमाणे तयार करण्यात आलं आहे. अवकाशात मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, याची चाचणी आणि परीक्षण करण्यासाठी आधी रोबो अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
महिला रोबोट अंतराळात पाठवणार
गगनयान मोहिमेपूर्वीच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी इस्रोने महिला रोबोट अंतराळात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची महिला रोबोट अंतराळवीर - व्योमित्र इस्रोच्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करणार आहे. मानवरहित व्योमित्र मिशन 2024 म्हणजेच या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पाठवले जाणार आहे. तर गगनयान, भारतीय अंतराळवीरांना घेऊन जाणारी देशातील पहिली मानवयुक्त अंतराळ उड्डाण मोहीम 2025 मध्ये प्रक्षेपित केली जाईल.
गगनयान मिशनची तयारी पूर्ण
उल्लेखनीय आहे की, 'गगनयान' लाँच करण्यापूर्वी, चाचणी वाहन फ्लाइट टीव्ही डी1 ची गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली होती. क्रू एस्केप सिस्टीम आणि पॅराशूट सिस्टीम परिपूर्ण करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. अधिकृत निवेदनानुसार, गगनयान मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गगनयान प्रक्षेपण वाहन म्हणजेच रॉकेटची तयारी पूर्ण झाली असून यान प्रक्षेपित करण्यासाठीची सर्व तयारीही इस्रोकडून पूर्ण करण्यात आली आहे.
इस्रो नव्या 'गगन' भरारीसाठी सज्ज
महिला रोबोट व्योमित्र यावर्षी अंतराळाता पाठवण्यात येणार आहे, तर गगनयान पुढील वर्षी प्रक्षेपित करण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेत अंतराळवीरांच्या क्रूला 400 किमीच्या कक्षेत प्रक्षेपित नेण्यात येईल आणि नंतर या अंतराळवीरांना भारतीय पाण्यात उतरवून आणि त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यात येईल.