yuva MAharashtra आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना होतो तुरुंगवास !

आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना होतो तुरुंगवास !




सांगली समाचार दि. ११|०२|२०२४

लग्नाच्या मुहुर्तापाठोपाठ महत्वाची बातमी आहे ती "बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !" या गाण्याची आठवण करून देणारी. लग्न समारंभ असो वा अन्य कुठलेही शुभ कार्य असो... पहिली चर्चा असते ती, ती अशा कार्यक्रमातील जेवणाची... जेवणातील पदार्थ, त्याची चव याची... आणि मग ओघाने चर्चेचा सूर वळतो तो जेवणावळी किती गर्दी होती याकडे... मात्र कधीतरी लग्नांमध्ये 'बिन बुलाऐ मेहमान' म्हणजेच आमंत्रण नसलेले अगंतुक लोकही हजेरी लावून जेवणावर ताव मारुन जातात. हे लोक ना मुलीकडून असतात ना मुलाकडून वाहत्या गंगेत हात धुवून घेऊयात म्हणत हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात. त्यांचं खरं तर ना वरपक्षातील कोणाशी नातं असतं ना वधूपक्षातील कोणाशी.

हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेली लग्नं, रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्टींमध्ये मोठ्या संख्येनं लोक हजेरी लावतात. मात्र येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसलेले, ओळखपाळख नसलेले लोक घेतात. न बोलावता कार्यक्रमांना येणाऱ्यांची संख्या कमी नाही. बऱ्याचदा हे असे लोक म्हणजे 'थ्री इडियट्स'मध्ये दाखवल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं असतात. अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नांमध्ये येऊन ताव मारुन जातं. लग्नातील जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशाने ही अशी लोक आलेली असतात. तुम्ही सुद्धा असं कधी केलं असेल किंवा अशा लोकांना तुम्ही पकडलं असेल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. आमंत्रण नसताना लग्नसमारंभात शिरुन जेवणावर ताव मारणाऱ्यांना 2 ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे का?

कायदा काय सांगतो ?

इन्स्टाग्रामवर वकील उज्वल त्यागी यांनी ओळख नसताना एखाद्या लग्नात किंवा सोहळ्यात फुकटात जेवल्यास काय कारवाई होऊ शकते ? या प्रश्नाचं उत्तर दिलं. आमंत्रण नसताना लग्नाला जाणं हा कायद्याने गुन्हा आहे. असे लोक पकडले गेल्यास कलम 442 आणि 452 अंतर्गत अशा व्यक्तींना किमान 2 तर जास्तीतजास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. न बोलावता लग्नाला जाणं हे ट्रेसपासिंग करण्यासारखं आहे. त्यामुळेच या कलमांअंतर्गत कारवाई केली जाते.

या वकिलाने दिलेलं उत्तर ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतात आमंत्रण नसताना आलेल्या पाहुण्याचाही सन्मान करण्याची पद्धत आहे. या व्हिडीओमुळे आणि शिक्षेच्या तरतुदीमुळे तरी लोक सुधारतील आणि अशाप्रकारे न बोलावता लग्नांना जाणं बंद करतील अशी अपक्षे अन्य एकाने व्यक्त केली आहे.