सांगली समाचार दि. १२|०२|२०२४
पुणे - कोणत्याही धार्मिक शुभ कार्याची, पुजेची सुरवात करताना विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रथम पूजा केली जाते. विघ्नहर्त्याची पूजा न करता केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यात अनेक विघ्ने येतात असा समज आहे. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरवात ही गणेश पूजनाने होते. घरात गणपतीची मूर्ती असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. पण, एका गणेश मूर्तीमुळे पुण्याची पेशवाई बुडाली होती असे म्हणतात. थोरले माधवराव पेशवे आजाराने ग्रस्त होते. त्यावेळी त्यांचे बंधू राघोबा दादा यांना पेशवाईची स्वप्ने पडू लागली होती. त्यांनी अघोरी उपासना सुरु केली आणि राघोबा दादा यांच्या घरातील देवघरात ती गणपतीची मूर्ती दिसू लागली. पण, याच मूर्तीमुळे पेशवाई बुडाली. इतकेच नव्हे तर पुढे ज्या ज्या घरात ही मूर्ती गेली त्या त्या घराचा विनाश झाला असे दाखले मिळतात.
साधारण 1765 नंतर राघोबा दादा यांच्या देवघरात ही मूर्ती दिसू लागली. थोरले माधवराव पेशवे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे राघोबादादांची हाव वाढली. त्यांनी काही अघोरी मांत्रिक आणि काळ्या जादूमध्ये पारंगत असलेल्या लोकांची मदत घेतली. कर्नाटक राज्यातील म्हैसूर प्रांतातील कोत्रकर हे त्यांचे अघोरी विद्येचे गुरु होते. त्यांनी राघोबा दादांना अनुष्ठान करण्यासाठी तांडव नृत्य करणाऱ्या उग्र गणपतीची मूर्ती दिली होती.
1773 मध्ये राघोबा दादा हे निजामावर स्वारी करण्यासाठी पुण्यातून निघाले. याच काळात शेडणीकर नावाच्या व्यक्तीने तांडव गणपती मूर्ती पळवली. त्याने आपल्या गावी एका पिंपळ झाडाखाली त्या मूर्तीची स्थापना केली. पण, येथूनही ही मूर्ती गायब झाली. पुढे तीच मूर्ती सातारा येथील एका ब्राह्मणाच्या घरी सापडली. मात्र, शेडणीकर आणि तो ब्राह्मण या दोघानाही या अघोरी मूर्तीचा फटका बसला. त्यामुळे ब्राह्मणाने त्या मूर्तीचे एका जुन्या पडक्या विहिरीत विसर्जन केले.
साधारण 60 वर्ष ही मूर्ती त्या पडीक विहिरीत होती. नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद यांच्या स्वप्नात ही मूर्ती आली. आपला शिष्य वामनराव कामत यांना सांगून त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि देवघरात स्थापना करून पूजा करू लागले. पण, काही काळातच कामत यांच्या कुटुंबातील मंडळी वारली. कामत यांचेही निधन झाले. त्यांची बहिण यांनी ती मूर्ती मुंबईचे डॉक्टर मोघे यांच्याकडे पाठविली.
तांडव गणपतीची मूर्ती इथून पुढे ज्यांच्या ज्यांच्याघरी गेली त्या त्या कुटुंबाचे नुकसान झाले. मजल दरमजल करत ही मूर्ती सध्या मद्रास येथील लंबू चेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठामध्ये आहे अशी माहिती मिळते. तांडव गणपतीची मूर्ती ज्याच्या कुणाच्या हाती आली त्याचे कधीच भले झाले नाही अशी याची ख्याती असल्यामुळे तिला हात लावण्यास कुणीही धजावत नाही. ‘पेशवे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकामध्ये तांडव गणपतीची मूर्तीचा संदर्भ आढळून येतो. मात्र, इतर कथांचा संदर्भ लागत नाही. भगवान शिवशंकर यांचे तांडव नृत्य हे अति विनाशकारी मानले जाते. त्याचेक प्रतीरूप म्हणजे ही तांडव गणेशमूर्ती मानली जाते. पंचधातु मधील ही मूर्ती दीड फुट उंचीची आहे.