Sangli Samachar

The Janshakti News

किडनी प्रत्यारोपण झालेलं असतानाही सर केला 'माउंट किलीमांजरो'

 


सांगली. समाचार  दि. २४|०२|२०२४

पुणे - उत्तुंग इच्छाशक्तीच्या जोरावर व्यक्ती अपेक्षांचा डोंगर सर करू शकतो. शहरातील दीपक गायकवाड किडनी प्रत्यारोपण केलेल्या कामगाराने जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या 'माउंट किलीमांजरो' (टांझानिया, आफ्रिका) हे ५ हजार ८९५ मीटर असलेले शिखर सर केले. दीपक (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, बजाजनगर, वाळूज) यांना सुरवातीपासूनच ट्रेकिंगची आवड आहे. त्यांच्या परिवारात आई, पत्नी कीर्ती, मुलगा शंभू (वय १३) असे सदस्य आहेत. महाराष्ट्रातील चारवेळा कळसुबाई शिखरासह राजगड, रायगड, हरिहरगड, तोरणागड, सिंहगड, देवगिरी असे सर्वच गड त्यांनी सर केलेले आहेत. सन २०१८ मध्ये किडनी फेल्युअरमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. मात्र, आईने किडनी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर डॉ. सचिन सोनी यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. यानंतर शरीराला प्रचंड जपावे लागते, काळजी घ्यावी लागते. प्रत्येक महिन्याला साधारण आठ ते दहा हजार रुपयांची औषधे घ्यावीच लागतात. अशा परिस्थितीत ट्रेकिंग कसे करणार, असा प्रश्न त्यांना होता.


दुर्दम्य इच्छाशक्ती

दीपक गायकवाड यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आफ्रिकेतील किलीमांजरो हे शिखर (५,८९५ मीटर) सर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या ध्येयपूर्तीसाठी पोलिस दलातील पहिले एव्हरेस्टवीर रफिक शेख यांनी बळ दिले. एवढेच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहकार्यही केले. छ्त्रपती संभाजीनगर येथील ड्रीम ॲडव्हेंचर्स या संस्थेच्या सहकार्याने दीपक गायकवाड यांनी हे उद्दिष्ट साध्य केले.

डॉक्टरांचा हिरवा कंदील

सर्व शारीरिक तपासण्या केल्यानंतर डॉ. सोनी यांनी हिरवा कंदील दाखविला. याशिवाय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (पुणे) येथील डॉ. प्रमोद पाटील यांनीही अतिशय कमी ऑक्सिजनवर दीपक यांची स्थिती काय असू शकेल, अशा काही चाचण्या पूर्ण करून घेतल्या होत्या. दीपक हे एनआरबी बेअरिंग्ज कंपनीत कार्यरत आहेत. त्यांची घरची स्थिती अत्यंत बेताचीच आहे. मात्र, प्रचंड इच्छाशक्ती असल्याने त्यांना कंपनीचे एचआर हेड प्रमोद ताकवले, 'विनोदराय इंजिनिअरिंग'चे संचालक संजय रोडगे यांनीही सहकार्य केले. त्यानंतर एका बॅंकेकडून कर्ज काढून दीपक यांनी हे मिशन 'माउंट किलीमांजरो' पूर्ण केले.

असा झाला प्रवास

दीपक गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी शिखर सर करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार त्यांनी ११ फेब्रुवारीला प्रत्यक्ष प्रवासाला सुरवात केली. मुंबई-नैरोबी (केनिया देशाची राजधानी) नंतर टांझानिया-किलीमांजरो विमानतळावर १२ रोजी रात्री उतरले. मुशी गावात वाहनाने प्रवास तेथे मुक्काम करून १३ रोजी पहाटे शिखर सर करण्यास सुरवात केली. तब्बल सहा दिवसांनंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी भारतीय वेळेनुसार सकाळी ७.०० वाजता त्यांनी 'माउंट किलीमांजरो' हे शिखर सुखरूप व यशस्वीपणे सर केले. दीपक हे किडनी ट्रान्सप्लांट झालेले असूनही अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय गिर्यारोहक ठरले असावेत. अशी दुहेरी कामगिरी ही छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात मानाचा तुरा रोवणारी आहे, हे नक्की.