सांगली समाचार | दि. ०५ |०२|२०२४
आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याबाबत प्रत्येकाची मते ठाम असतात. परिणामी हल्ली लग्न जमणं किती अवघड झालं आहे, हे आपण प्रत्येकजणच जाणतो. तशात मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षांच्या चर्चाही कानावर येत असतात.
पूर्वी मुलीचे वडील योग्य वर शोधण्यासाठी किती उंबरे नि किती चपलांचे जोड झिजवले हे सांगायचा... आता परिस्थिती उलट झाली आहे. आता मुलीच्या नव्हे मुलाच्या वडिलांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळेच विवाह जुळविणारे एजंट नि मेट्रोमनी साईटची चलती असल्याचे पहावयास मिळत आहे... यातूनच अनेकानेक भलेबुरे, गंमतीदार घडलेले किस्से ऐकायला मिळतात... असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजतो आहे...
ही घटना भारतातील नसून रशियातील आहे. रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलेक्झँडर जदान असं या तरुणाचं नाव आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या या 23 वर्षीय तरुणाने 'टिंडर' या डेटिंग साईटवर अकाउंट उघडलं होतं. त्याने या साईटवर चॅटजीपीटी (ChatGPT) आणि अन्य एआय बॉट्सचा वापर केला. सुमारे 5,000 तरुणींशी चॅटिंग केल्यानंतर त्याला आपल्या मनासारखी जोडीदार मिळाल्याचा दावा अलेक्झांडरने केला आहे.
त्याला हे सगळं करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागला. "मी सुरुवातीला चॅटजीपीटीला हे सांगितलं की मी कशा प्रकारे बोलतो. या प्रोग्रामला ट्रेन करण्यासाठीच बराचसा वेळ खर्च झाला. अखेर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर या चॅटबॉटने तरुणींशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यानंतर माझ्यासाठी अयोग्य असणाऱ्या मॅचेसना हे बॉट आपोआप हटवू लागलं." असं अॅलेक्झँडरने सांगितलं.
चॅटजीपीटीने सर्व तरुणींशी संवाद साधत असतानाच, करीना इमरानोव्ना ही तरुणी सर्वात योग्य मॅच असल्याचं अॅलेक्झँडरला सांगितलं. एआय चॅटबॉटनेच या दोघांच्या भेटीसाठी डेट्स फिक्स केल्या, आणि प्रपोज करण्यासाठीही मदत केली. "तुमचं नातं अगदी संतुलित आणि मजबूत आहे, त्यामुळे तू तिला प्रपोज करू शकतोस" असं एआयने या तरुणाला सांगितलं.
यानंतर अॅलेक्झँडरने करीनाला प्रपोज केलं. या दोघांचं लग्नही झालं, आणि आता त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू आहे. करीनाला लग्नानंतर समजलं की अॅलेक्झँडर चॅटिंगसाठी एआयचा वापर करत होता. मात्र, यामुळे काही फरक पडत नसल्याचं तिने म्हटलं आहे. तीदेखील अॅलेक्झँडरला आपला परफेक्ट मॅच मानते.
आहे की अजब लग्नाची गजब गोष्ट ?...