सांगली समाचार - दि. २६|०२|२०२४
नवी दिल्ली - भारतीय महिलांना शिक्षणानंतर लगेच लग्नाऐवजी नोकरी करणे महत्त्वाचे वाटते, असे युनायटेड नेशन्स संघटनेच्या युनिसेफने (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्र्न्स इमर्जन्सी फंड) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. लग्न करण्याऐवजी नोकरीला प्राधान्य देणे, यावरून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांची प्रबळ इच्छाशक्ती दिसते.
पुरुषांनी नोकरी किंवा व्यवसाय करावा, पैसे कमवावेत आणि स्त्रियांनी घर सांभाळावे, अशा प्रकारची व्यवस्था पूर्वीपासून आपल्या समाजात होती. पहिल्यापासून पुरुषालाच घरात जास्त मान होता. कारण- तोच एकमेव कमावता माणूस घरात असायचा. त्याचे आणखी एक कारण म्हणजे स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे. स्त्रीने फक्त चूल व मूल बघावे हीच अपेक्षा तिच्याकडून केली जायची. त्यामुळे एकंदर भारतीय स्त्रियांची सामाजिक, बौद्धिक प्रगती होऊ शकली नाही; पण आता काळ बदलला आहे. आज मुलीला शिकून नोकरी करण्याची इच्छा असते. मुलींना स्वावलंबी व्हायला आवडते. या सर्वेक्षणातून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
UNICEF च्या सर्वेक्षणात काय सांगितले?
नोकरीमध्ये महिलांचा सहभाग लक्षात घेऊन, UNICEF ने एका सर्वेक्षणातून तरुणाईचे मत जाणून घेतले. युनिसेफच्या युवा व्यासपीठ ‘युवा’ आणि यू-रिपोर्टद्वारे आयोजित या सर्वेक्षणात संपूर्ण भारतातील १८ ते २९ वयोगटातील २४ हजारपेक्षा जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणात असे समोर आले की, ७५ टक्के तरुण महिला आणि पुरुषांना महिलांनी शिक्षणानंतर नोकरी करणे महत्त्वाचे वाटते.
नोकरी की लग्न?
मुलीच्या शिक्षणानंतर नोकरी आणि लग्न या दोन गोष्टी नजरेसमोर येतात. या दोन्ही गोष्टी त्या त्या पातळीवर आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही शिक्षणानंतर नोकरी करणाऱ्या महिला पाहिल्या असतील किंवा शिक्षणानंतर लग्नाला प्राधान्य देणाऱ्या महिला पाहिल्या असतील किंवा लग्न करून नोकरी करणाऱ्या महिला पाहिल्या असतील किंवा लग्न करून घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडणाऱ्या महिला पाहिल्या असतील.
पूर्वी भारतात महिलांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागत असे. शिक्षण पूर्ण असो किंवा अपूर्ण; मुलीचे खूप लवकर लग्न केले जायचे. पण, आता परिस्थिती बदलली आहे. स्त्रियांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व कळले आहे. स्त्रिया शिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नोकरीला अधिक महत्त्व देताना दिसतात. त्या स्वत:च्या पायावर उभे राहून नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि जोडीदारावर अलवलंबून राहण्याची गरज भासत नाही. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी किंवा व्यवसाय करताना दिसतात.