सांगली समाचार दि. २९|०२|२०२४
नवी दिल्ली - तुम्हाला एकुलती एक मुलगी असेल आणि तुम्ही तिच्या शालेय शिक्षणाचा विचार करता आहात, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) 'सिंगल गर्ल स्टुडंट'साठी शिष्यवृत्ती योजना असून त्या अंतर्गत पालकांना दिलासा मिळत आहे. देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. एकुलती एक लेक असेल तर तिला सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण त्या संबंधित वर्षात मिळणे आवश्यक आहे. अशी मुलगी सीबीएसईच्या 'एकल मुलगी शिष्यवृत्ती' योजनेसाठी पात्र ठरते. ही शिष्यवृत्ती गुणांकनाच्या आधारे देण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी दहावीतील गुणांसह संबंधित विद्यार्थिनींने सीबीएसईशी संलग्न शाळेमध्ये अकरावी बारावीचे शिक्षण घेणे आवश्यक असून तिचे शाळेतील शिक्षण शुल्क हे १,५०० रुपये दरमहा यापेक्षा जास्त नसावे. भारतीय नागरिकत्व असणाऱ्या विद्यार्थिनींसाठीच ही योजना लागू असणार आहे. पाचशे रुपये महिना अशा पद्धतीने ही शिष्यवृत्ती दिली जाते. जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. ईएससी/एनईएफटी स्वरूपात शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. एकदा ही शिष्यवृत्ती रद्द झाल्यास संबंधित विद्यार्थिनीला कोणत्याही अन्य परिस्थितीत ही शिष्यवृत्ती दिली जात नाही. शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी सीबीएसईतर्फे संकेतस्थळावर वेळापत्रक, नियमावली, सूचना जाहीर करण्यात येतात.
आवश्यक पात्रता -
दहावीच्या परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण
सीबीएसईशी संलग्न शाळांमध्ये इयत्ता अकरावी-बारावीचा प्रवेश असणे अपेक्षित
विद्यार्थिनी तिच्या पालकांना एकुलती एक असावी
शाळेचे शिक्षण शुल्क दर महिन्याला १,५०० रुपयांपेक्षा अधिक नसावे.
अर्ज कसा करायचा?
१. सीबीएसईच्या संकेतस्थळाला भेट द्या
२. संकेतस्थळावर शिष्यवृत्ती टॅगमध्ये जा
३. शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शक सूचना वाचा आणि तेथेच त्या-त्या वर्षाचा अर्ज भरा
४. संबंधित शाळेत पडताळणी करावी
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -
: https://www.cbse.gov.in