yuva MAharashtra वारणा उद्भव योजना गुंडाळली; रविंद्र वळवडे यांच्या माहिती अधिकारातील उत्तरातून वास्तव आलं समोर

वारणा उद्भव योजना गुंडाळली; रविंद्र वळवडे यांच्या माहिती अधिकारातील उत्तरातून वास्तव आलं समोर

सांगली समाचार- दि. २३|०२|२०२४

सांगली - प्रतिवर्षी वारणा नदीतही प्रदूषित पाण्यामुळे मासे मरत आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्षही तितकेच गंभीर आहेत. सांगली महापालिकेच्या  बहुचर्चित वारणा उद्‍भव योजनेला  'ब्रेक' लागला आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी माहिती अधिकारात प्रशासनाकडे माहिती विचारली असता अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे उत्तर मिळाले. 

सध्याच्या कृष्णा प्रदूषण योजनेचा  प्रकल्प आराखडाच झालेला नाही. कृष्णेइतकीच वारणा नदीची प्रदूषणाची स्थिती असताना राजकीय दबावाखाली ही योजना पुढे रेटली जात होती. नागरिक जागृती मंच, महापूर नियंत्रण कृती समितीसह तज्ज्ञांनी या योजनेला विरोध करताच चांदोली धरणातून थेट नैसर्गिक उताराने पाणी घेता येईल, अशी योजना पुढे मांडली.

दीड दशकापूर्वी वारणा उद्‍भव योजनेचा प्रस्ताव मांडला होता. कृष्णा नदीतील पाणी प्रदूषित असून त्याऐवजी वारणा नदीवरील समडोळी, दानोळी बंधाऱ्यातून महापालिकेला पाणी दिले जावे, असा मूळ प्रस्ताव होता. तथापि आता वारणा नदीची अवस्थाही कृष्णेसारखीच आहे. प्रतिवर्षी वारणा नदीतही प्रदूषित पाण्यामुळे मासे मरत आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्षही तितकेच गंभीर आहेत. 

थेट चांदोली धरणातून पाणी घेतले जावे, यासाठी नागरिक जागृती मंचतर्फे विविध तज्ज्ञांच्या सहभागाने परिसंवाद घेण्यात आला होता. हजार कोटींच्या निधीतून महापालिका क्षेत्रासह शिराळा, इस्लामपूर, आष्टा शहरांनाही थेट धरणातून स्वच्छ पाणी देता येणे शक्य आहे, असा निष्कर्ष पुढे आला. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी शासनाकडे तो प्रस्ताव पाठवण्याचाही निर्णय घेतला होता. आयुक्त सुनील पवार यांनी दोन्ही योजनांचे प्रस्ताव पाठवले जातील, अशी भूमिका घेतली होती. 

'म्हैसाळ' बॅरेज कारण 

परंतु म्हैसाळ बॅरेजेस पूर्ण झाल्यानंतर कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी इतकी वाढलेली असेल की सांगली आणि दानोळी असे दोन्ही बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे वारणा उद्‍भव योजना कालबाह्य झाली आहे. त्यामुळेच प्रशासनाने याबाबत ठोस अशी अद्याप कृती केलेली नाही. माहिती अधिकारातील उत्तरातून हेच वास्तव पुढे आले आहे.