सांगली समाचार - दि. २०|०२|२०२४
नवी दिल्ली - लसणाच्या वाढत्या किमतीमुळे स्वयंपाकघराचं बजेट पूर्णपणे कोलमडून गेलं आहे. त्यानंतर काही दिवसांतच कांद्याचे किरकोळ दर वाढले. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. कांद्याचे दर वाढल्याने घरातील स्वयंपाकघर आणि रेस्टॉरंट या दोन्हींसाठी मोठं संकट निर्माण होत आहे. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठे घाऊक कांदा बाजार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. तेथे सोमवारी कांद्याच्या सरासरी घाऊक दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली. सोमवारी, कांद्याचा प्रति क्विंटल सरासरी भाव 1,280 रुपयांवरून 1,800 रुपयांपर्यंत वाढला, किमान आणि कमाल भाव अनुक्रमे 1,000 रुपये आणि 2,100 रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला.
सरकारी दरही वाढले
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने 8 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली (Onion Price) होती. ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्याही हितासाठी सरकारने कांदा पिकाची उपलब्धता आणि किमतीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं होतं.
सरकारी दरांबद्दल बोलायचे झाले तर, 18 फेब्रुवारी रोजी ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटवर कांद्याची सरासरी किंमत 29.83 रुपये प्रति किलो होती. 19 फेब्रुवारी रोजी हीच सरासरी किंमत 32.26 रुपयांवर (Onion Price Hike) पोहोचली. म्हणजेच 24 तासांत देशात कांद्याच्या सरासरी भावात किलोमागे 2.43 रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात.
लसणाच्या दरातही वाढ
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात लसणाचे भाव 550 रुपयांवर पोहोचले आहेत. अनेक शहरांमध्ये लसणाच्या किमतीत वाढ झाली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशमध्ये लसुण 500 ते 550 रुपये प्रति किलो दरम्यान विकला जात आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा लसूण 220 ते 240 रुपये दराने विकला जात आहे.देशाच्या अनेक भागांत किरकोळ बाजारात दर 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार तिरुचीमधील गांधी मार्केटमधील किरकोळ दुकानांमध्ये 1 किलो चांगल्या दर्जाचा लसूण 400 रुपयांना विकला जात होता. बहुतेक मेट्रो शहरांमध्ये लसणाचे दर प्रति किलो 300 ते 400 रुपये आहेत.