सांगली समाचार - दि. २९|०२|२०२४
सांगली - थंडीचा हंगाम संपत आला असतानाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असून जिल्ह्यातील जत व आटपाडी तालुक्यातील ६१ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवारी देण्यात आली. या गावातील १ लाख २९ हजार ५५६ लोकांना आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागावावी लागत आहे.जत तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या ५८ तर आटपाडी तालुक्यात ४ आहे. सध्या जतमध्ये ५४ तर आटपाडी तालुक्यात ३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या दोन तालुक्यातील ६१ गावे आणि ४११ वाडी वस्तींना सध्या टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यात आला असून यामध्ये विविध उपाय योजनांसाठी ३१ कोटी ४६ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंंचन योजनांचे वीज वापराचे ४५ कोटींचे देयक टंचाई निधीतून देण्यात येणार आहे.टंचाईच्या झळा सुसह्य करण्यासाठी विविध उपाय योजनांचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजनांना मान्यता देणे, विहीरींचे अधिग्रहण करणे आदी उपायांचा समावेश आहे.