सांगली समाचार दि. १७|०२|२०२४
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर गुरुवारी (ता.१५) दुपारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत 'आता रडायचे नाही तर लढायचे' असा नारा नेत्यांनी दिला. नांदेड शहरातील नवा मोंढा भागातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रदेश पातळीवरील सूचनेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, पक्षनिरीक्षक युसूफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांसह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत या बैठकीत अनेकांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आरोपांच्या फैरी झाडल्या. नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकाही केली. काँग्रेसमध्ये जे घडले ते घडले. आता रडायचे नाही, तर लढायचे. ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या काँग्रेसचा व त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन तत्त्वावर पुढे जायचे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, पक्षनिरीक्षक युसूफ शेख, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, डॉ. रेखा चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मारोतराव कवळे गुरुजी, अनिल पाटील बाभळीकर, मसूद खान, संजय भोसीकर, अनिल मोरे, बालाजी चव्हाण, प्रफुल्ल सावंत, आनंद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गळती लागलेली आहे. नांदेडने या घटनेतून धडा घेत, अधिक पडझड न होण्याची काळजी घेतलेली आहे. हाच कित्ता आता संपूर्ण देशभर राबवण्याचे केंद्रीय हाय कमांडने ठरवलेले आहे. याचाच एक भाग म्हणजे नांदेड शहरात आयोजित केलेली ही बैठक. आता अशीच बैठक प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.