Sangli Samachar

The Janshakti News

पक्षांतर करणा-यांना नितीन गडकरी यांच्याकडून कानपिचक्या





सांगली समाचार  दि. ०८|०२|२०२४

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये जोरात इनकमिंग सुरू आहे. अनेक पक्ष फुटले आणि तयार झालेले नवे गट भाजपाबरोबर सत्तेत बसले आहेत. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे.

काही संधीसाधू नेते मूळ विचारांशी तडजोड करून सातत्याने सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतात, याबाबत गडकरी यांनी चिंता व्यक्त केली.

नितीन गडकरी म्हणाले की, निष्ठावान नेते किंवा स्वतःच्या मूळ विचारसरणीवर ठाम असणाऱ्या नेत्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. मी नेहमी गंमतीने म्हणतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्याला कधीच शिक्षा होत नाही.

आमच्यातील मतभेद आणि वादविवाद ही आमची समस्या नाही. काही लोकांकडे विचारच नाहीत ही मोठी अडचण आहे. काही नेते आहेत जे त्यांच्या मूळ विचारसरणीसह उभे आहेत. त्यांचा दृढनिश्चय सातत्याने दिसून येतो. ते त्यांच्या विचारांची प्रतारणा करत नाहीत. परंतु, या नेत्यांची संख्या खूप कमी आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी चांगली नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

राजकारणात सध्या असे काही लोक आहेत जे ना डावे आहेत ना उजवे, ते केवळ संधीसाधू आहेत. हे लोक या ना त्या मार्गाने सत्ताधारी पक्षाशी ताळमेळ राखून असतात. आपल्याला नेहमी सत्ताधारी पक्षाबरोबर कसं राहता येईल याची काळजी घेतात, असं नितीन गडकरी म्हणाले.

महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरीच शिष्टमंडळं मला येऊन भेटतात. मी कधीही जात-पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.