Sangli Samachar

The Janshakti News

फाटाफुटीनंतर काँग्रेस हायकमांड अलर्टवर !





सांगली समाचार दि. - १२|०२|२०२४

मुंबई - अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली आहे. आपण येत्या दोन ते तीन दिवसात राजकीय दिशा ठरवू, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

अशोक  चव्हाण यांच्यान॔तर आणखी काँग्रेसचे 10 ते 15 आमदार भाजपात सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण अशोक चव्हाण यांनी आपण एकाही आमदाराला सोबत घेऊन जाणार नाही. आपण एकाही काँग्रेस आमदाराच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट केलंय. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण यांनी हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच येत्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरं जाईल, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता घडामोडी घडणार आहेत.



सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदारांची येत्या 14 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार मुंबईत सर्व काँग्रेस आमदारांची येत्या 14 तारखेला बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासोबत नेमके किती आमदार आहेत ते स्पष्ट होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासह जवळपास 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडकडून सूचना देण्यात आली आहे की, प्रत्येक आमदाराशी संपर्क करा.

काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तातडीने बैठक बोलावली असून या बैठकीत आगामी काळातील घडामोडी आणि रणनीतीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खासदार राहुल गांधी यांच्या भेटीसाठी छत्तीसगडला गेले आहेत. ते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. नाना पटोले राहुल गांधी यांच्या भेटीनंतर दिल्लीला जाणार आहेत. तिथे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.