सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४
नवी दिल्ली - 'तिसरी बार फिर मोदी सरकार, अबकी बार चारसौ पार' असे ध्येय डोळ्यापुढे ठेवत भाजप संपूर्ण ताकदीने लोकसभा निवडणुकीसाठी रणांगणात उतरली आहे. भाजपचे दिवंगत नेते तथा माजी दूरसंचारमंत्री प्रमोद महाजन यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना घरोघरी अटलींच्या आवाजात करून घेतलेल्या रेकॉर्डेड 'फोनकॉल्स'ने भारतीय निवडणुकीच्या प्रचारात वेगळाच इतिहास रचला होता. 'नमस्कार मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हू..' हे वाक्य आजही मतदारांच्या स्मृतीत आहेत. अशाच 'हायटेक' तंत्रज्ञानाचा वापर भाजप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी करणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रचारामागे भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन यांचे नाव घेतले जायचे. आता नरेंद्र मोदी यांच्या प्रचारतंत्राची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांभाळली आहे. अर्थात त्यांच्या मदतीला महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस आहेतच, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्व 543 जागांवर भाजपने स्वतंत्र प्रचार यंत्रणा अस्तित्वात आणली आहे. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात 'वॉररूम' आणि 'कॉलसेंटर' सुरू करण्यात आले आहेत. यंदांच्या निवडणुकीत भाजप प्रचारासाठी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' अर्थात AI या अत्यंत नवीन व 'हायटेक' तंत्राचा वापर करणार आहे.
प्रचारासाठी सद्य:स्थितीत भाजपने देशभरात 65 हजारावर मोबाइल सिमकार्ड खरेदी केले आहेत. हे सर्व सिमकार्ड वेगवेगळ्या नावांवर असून त्यातील एकही सिमकार्ड खोट्या कागदपत्रांच्या आधारावर मिळविलेले नाही, हे विशेष. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येणार आहे, तसतशी सिमकार्ड आणि मोबाइल बिलांची संख्या वाढणार आहे.
देशात सुरू कार्यान्वित असलेल्या 'फाइव्ह-जी एअर फायबर ब्रॉडबॅन्ड' वायरने जोडल्या जाणाऱ्या 'ब्रॉडबॅन्ड'च्या सुमारे 2 हजार 88 जोडण्या सक्रिय झाल्या आहेत. देशभरातील मतदार संघांचा विचारक केल्यास सध्या 38 हजारावर कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब आणि मोबाइल वापरण्यात येत आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर, तेलंगण, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांवर प्रचारासाठी खास जोर देण्यात येणार आहे.
मतदारसंघानुसार खर्च
भाजपकडून देशभरातील मतदारसंघांचे सर्वेक्षण आधीच करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित अनेक संस्थांनीही प्रत्येक मतदारसंघाचा कल जाणून घेतला आहे. अशात देशभरातील मतदारसंघानुसार पक्षाकडून प्रचारावर होणाऱ्या खर्चाची मर्यादा ठरविण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघातील स्थिती मजबूत आहे, तिथे खर्चासाठी तुलनेने कमी रक्कम मिळणार आहे. अधिक जोर लागणाऱ्या मतदारसंघांसाठी अर्थातच खिशाला ताण देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे.
AI वापरासाठी स्वतंत्र यंत्रणा
भाजप यंदाच्या निवडणुकीत 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा सर्वाधिक वापर करणार आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एकच चेहरा 'प्रोजेक्ट' करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते सध्या देशभरातील मतदारसंघांचा दौरा करीत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाच्या विभागनिहाय बैठकींचे सत्र सुरू होणार आहे. या बैठकीत 'हवेत गोळीबार नको, अगदी डिटेल आणि मायक्रो प्लानिंगचे प्रेझेंटेशन हवे' असे आदेश संबंधिताना देण्यात आले आहे.
अखेरच्या क्षणी ठरणार चेहरे
भाजप सगळ्यांना नेहमीच धक्कातंत्र देते. अखेरच्या क्षणी भाजपने मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री पदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार असलेला चेहरा बदलला. अशात लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला कितीही तयार राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्या तरी अखेरच्या क्षणीच उमेदवारांचा चेहरा ठरणार असल्याचे भाजपमधील दिल्लीतील एका उच्चपदस्थ व जबाबदार नेत्याने 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.