yuva MAharashtra माघी एकादशीनिमित्त ३० प्रकारच्या फुलांनी "माऊली" सजली

माघी एकादशीनिमित्त ३० प्रकारच्या फुलांनी "माऊली" सजली

सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

पंढरपूर - माघ शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशीच्या निमित्ताने आज पंढरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब, कॉनवर अशा विविध देशी-विदेशी 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार, सभामंडप आदी ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीने देवाचे रूप खुलले आहे.

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचं व्रत साजरं केलं जातं. त्या दिवशी उपवास करून लोक भगवान विष्णू, पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करतात. जया एकादशी व्रताची कथा पद्मपुराणात सांगितली आहे, ज्यात त्याचे महत्त्वही सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णांने युधिष्ठिराला सांगितले होते की, जया एकादशीचं व्रत केल्यानं माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. एवढेच नाही तर त्या आत्म्याला भूत, पिशाच इत्यादींपासून मुक्ती मिळते. जया एकादशीचं व्रत केल्यानं ब्रह्मदेवाच्या हत्येचे पापही नष्ट होऊ शकते.