yuva MAharashtra दुष्काळी लातूरमध्ये शेतकऱ्यांनी उभारली कंपनी; कमावतायेत 3 कोटींचा नफा!

दुष्काळी लातूरमध्ये शेतकऱ्यांनी उभारली कंपनी; कमावतायेत 3 कोटींचा नफा!

 


सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

लातूर - 'शेतकऱ्यांना पिकवता येते, विकता येत नाही.' असे नेहमीच म्हटले जाते. मात्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबली गावच्या तरुण शेतकऱ्यांनी देवनी फार्मा प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली असून, ते परिसरातील शेतकऱ्यांसह कंपनीचा देखील विकास घडवून आणत आहे. ही कंपनी सुरु करणारे सर्व शेतकरी असून, ते शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्व शेतमाल खरेदी करतात. शेतमालाची ही खरेदी प्रामुख्याने कंपनीकडून पुढील हंगामासाठी बियाणे निर्मिती करण्यासाठी केली जाते. ज्यामुळे कंपनीसह शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होत असून, त्यांना मार्केटमधील दरापेक्षा कंपनीकडून नेहमीच अधिकचा दर दिला जात आहे.

शेतकऱ्यांकडून थेट खरेदी 

देवनी फार्मा प्रोड्यूसर कंपनी ही शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा, तूर, ज्वारी आणि अन्य धान्य पिकांची थेट खरेदी करते. ज्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचत आहे. याशिवाय बाजार समितीमध्ये खाल्ली जाणारी मध्यस्थांची रक्कम देखील वाचत आहे. याशिवाय कंपनी बाजारातील भावापेक्षा शेतकऱ्यांना नेहमी अधिकचा दर (Success Story) देते. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल कंपनीमध्ये आणला जातो. त्यानंतर हा सर्व माल एका मशीनमध्ये टाकून गुणवत्ता पूर्ण टपोरा माल बियाणे निर्मितीसाठी वापरला जातो. यासाठी सर्व जसे आकार, रंग, बियाण्यातील आर्द्रता या गोष्टींची तपासणी केली जाते. अर्थात सरकारच्या नियमानुसार मापदंड पूर्ण करत, छाटणी करून त्याची बियाणे निर्मिती केली जाते.



पीक उत्पादनात 20 टक्के वाढ

देवनी फार्मा प्रोड्यूसर कंपनीला आपला शेतमाल व्रिक्री करणारे एक शेतकरी सांगतात की, "यापूर्वी आम्ही बाजारातून बियाणे आणून पेरणी करायचो. मात्र आता आम्हाला थेट आमच्या समोर उच्च गुणवतेचे बियाणे कसे तयार होते. हे अनुभवयाला मिळत आहे. मुख्य म्हणजे कंपनी हंगामात शेतकऱ्यांना माफक दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देते. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात 20 टक्के वाढ अनुभवाला मिळत आहे. इतकेच नाही तर आपला माल शेतकऱ्यांनी काढणी केल्यानंतर कंपनी थेट बांधावर येऊन खरेदी करते. ज्यामुळे बाजारभावापेक्षा चार पैसे अधिक मिळत असल्याची भावना आम्हा शेतकऱ्यांमध्ये आहे."

कसे चालते कंपनीचे काम?

शेतकऱ्यांच्या पोरांनी सुरु केलेल्या या देवनी फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिभीषण भोसले हे आहेत. ते सांगतात, "आम्ही शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचे बियाणे पुरवण्यासाठी तसेच त्यांना शहरातील घाऊक बाजारासोबत थेट जोडण्यासाठी या कंपनीची स्थापना केलेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही सध्याच्या चालू हंगामात हरभरा, तूर, ज्वारी आणि गहू सारख्या धान्याची खरेदी करतो. खरेदी मालापैकी उच्च गुणवत्तेचा टपोरा माल बाजूला काढला जातो. जो काही प्रमाणात डी-मार्ट, बिग बाजार आणि अन्य ठिकाणी विक्रीसाठी पाठवत आहोत. याशिवाय आवश्यकतेनुसार कंपनीकडून बियाणे निर्मिती केली जाते."

जोडलीये 2000 शेतकऱ्यांशी नाळ

बिभीषण भोसले यांनी म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपासून आमच्या कंपनीसोबत जवळपास 2000 शेतकरी जोडले आहे. ज्याद्वारे या शेतकऱ्यांना देवनी फार्मा प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून तीन कोटींचा फायदा झाला आहे. पुढील एक वर्षांच्या काळात आम्हाला कंपनीच्या शेअरधारक शेतकऱ्यांची संख्या 5000 पर्यंत वाढवण्याचा आमचा विचार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कमी दर मिळतो. त्या तुलनेत कंपनीकडून शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न म्हणून नेहमीच बाजारभावपेक्षा अधिक दर दिला जातो. ज्यामुळे कंपनीसोबत जोडले गेलेले शेतकरीही खुश आहेत आणि कंपनीची देखील ग्रोथ होत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.