yuva MAharashtra सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् रामदेव बाबांचे 2,300 कोटींचे नुकसान ?

सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् रामदेव बाबांचे 2,300 कोटींचे नुकसान ?

 


सांगली समाचार - दि. २९|०२|२०२४

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने काल सांगितले की पतंजली आयुर्वेदाने 21 नोव्हेंबर 2023 रोजी औषधांसंबंधीच्या जाहिरातींबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन केले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा केली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत जाहिरात करू नये

सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदने पुढील आदेश येईपर्यंत आपल्या कोणत्याही वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करू नये. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वैद्यकीय विधान मीडियामध्ये करू नये, असे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की या मुद्द्याला 'ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद' असा वाद बनवायचा नाही, तर भ्रामक वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर योग्य तोडगा काढायचा आहे. 

आयएमएचा पतंजली आयुर्वेदावर आरोप

सर्वोच्च न्यायालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) याचिकेवर सुनावणी झाली. IMA ने पतंजली आयुर्वेदावर 2022 मध्ये आरोप केला होता की, रामदेव यांची कंपनी ॲलोपॅथीच्या वैद्यकीय पद्धतींविरोधात चुकीची माहिती पसरवत आहे. आयएमएची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील पीएस पटवालिया म्हणाले की पतंजली आयुर्वेदने योगाच्या मदतीने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्ट आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला स्वतः वृत्तपत्रासह सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी पोहोचले. वृत्तपत्रावर जाहिरात दाखवताना त्यांनी पतंजली आयुर्वेदला विचारले की, न्यायालयाच्या आदेशानंतरही ही जाहिरात आणण्याची हिंमत तुमच्यात कशी काय आली?सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी पतंजली आयुर्वेद यांना विचारले की, तुम्ही आजार बरा करू असे कसे म्हणता? आमचा इशारा असूनही, तुम्ही म्हणत आहात की आमची उत्पादने रासायनिक आधारित औषधांपेक्षा चांगली आहेत.

105 मिनिटांत 2300 कोटी रुपये बुडाले

न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार, BSE मध्ये पतजली फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली आणि कंपनीचा शेअर 1556 रुपयांवर आला. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1620.20 रुपयांवर बंद झाले होते. 105 मिनिटांच्या ट्रेडिंग सत्रात रामदेव यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले.