सांगली समाचार दि. 10|02|2024
नवी दिल्ली - ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासावर भाष्य केले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. याविषयी बोलताना मोदींनी स्वच्छता मोहिमेवर प्रकाश टाकला.
भंगार विकून 1100 कोटी मिळाले
स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात यशस्वी अभियानापैकी एक आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारने सुरु केलेल्या या स्वच्छता अभियानाकडे विरोधकांनी तुच्छतेने पाहिले. मी स्वच्छता करत असताना माझ्यावर लोक हसले मात्र मी सांगू इच्छितो की, या अभियानातून मोठ्या प्रमाणात भंगार मिळाले, हे भंगार विकून सरकारला 1100 कोटी रुपयांचा नफा झाला. या अभियानामुळे देश स्वच्छ झाला तसेच देशाच्या तिजोरीतही भर पडली.
आम्ही भ्रष्टाचार नष्ट केला
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, 'आम्ही कोणतेही काम छोटे मानत नाही. आमच्या सरकारने 11 कोटी शौचालये बांधली. यामुळे रोगराई कमी झाली. तसेच सरकारने 4 कोटी गरीबांना घरे दिली, त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही भ्रष्टाचार नष्ट केला. एक पंतप्रधान म्हणालो होते की, एखाद्या योजनेतील एक रुपया नागरिकाला द्यायचं ठरवले की, त्याच्यापर्यंत 15 पैसे पोहोचायचे. मात्र आमच्या काळात जर 1 रुपया पाठवला तर लाभार्थ्यापर्यंत 100 पैसे पोहोचतात.
70 वर्षांमध्ये जे झाले नाही ते अवघ्या 10 वर्षांत घडले
नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हटले की, 70 वर्षांमध्ये जे झाले नाही ते अवघ्या 10 वर्षांत झाले. 2014 पर्यंत 7 दशकात सुमारे 20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते. मात्र आमच्या सरकारच्या 10 वर्षात आम्ही 40 हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले आहे. तसेच 70 वर्षांमध्ये 18 हजार किमी रस्ते होते आम्ही 10 वर्षांत 30 हजार किमी रस्ते बनवले.
प्रकल्प वेळेत पूर्ण करणे ही सरकारची ओळख
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, प्रकल्प लवकर आणि वेळेत पूर्ण करून आम्ही देशाचा खूप पैसा वाचवला आहे. ही आमच्या सरकारची ओळख बनली आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम किती वेगाने झाले ते तुम्ही पाहिले आहे. ज्या योजनेची पायाभरणी मी केली, त्याच योजनेचे उद्घाटनही माझ्याच हस्ते झाले हे आपण पाहिले आहे.