Sangli Samachar

The Janshakti News

'10 टक्क्यांचं आरक्षण स्वीकारण्यास तयार पण..'; जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य


सांगली समाचार  - दि. २९|०२|२०२४

जालना - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अद्यापही सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी दहा टक्के आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

मी दहा टक्के आरक्षण स्विकारण्यास तयार आहे, मात्र हे दहा टक्के आरक्षण ओबीसीमधून द्या, मग मी आरक्षण स्विकारतो. सरकार देखील सांगत आहे, मराठा समाज मागास सिद्ध झाला असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी गिरीश महाज यांनी केलेल्या टीकेचा देखील समचार घेतला आहे. मोदी साहेब आले गेले, मला चॅलेंज देऊ नका, आम्हाला जनता कळते. तुम्ही आमचे काय लाड केले? मला बोलायला लावू नका, समाजाला एक सांगतो मी मराठा लेकरांसाठी लढत आहे. समाजच माझा मालक आहे. त्यांच्या शब्दा पूढे मी जात नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरवर प्रतिक्रिया 

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकासआघाडीला काही प्रस्ताव दिले. या प्रस्तावामध्ये मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेंन्टंड कॅन्डिटेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांचा शब्द टाळणे मला जड जात आहे, पण सध्या माझा फोकस हा आरक्षणावर आहे. माझा लढा राजकीय नाही, सामाजिक आहे. मी माझ्या समाजाच्या पुढे जात नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.